For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीमाहद्दीत वन्यप्राण्यांची दहशत

09:22 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
सीमाहद्दीत वन्यप्राण्यांची दहशत
Advertisement

मानवी वस्तीत शिरकाव : रोखण्याचे वनखात्यासमोर नवे आव्हान, नागरिकांत भीती

Advertisement

बेळगाव : सीमाहद्दीत वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे परिसरात चिंता व्यक्त होऊ लागली आहे. हत्तीपाठोपाठ गवीरेड्यांची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना रोखण्याचे नवे आव्हानदेखील वनखात्यासमोर उभे ठाकले आहे. डोंगर परिसरात चारा आणि पाण्याचा तुटवडा निर्माण होत असल्याने वन्यप्राणी सैरभैर होऊन मानवी वस्तीत शिरण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषत: मागील आठवडाभरात सीमाहद्दीत हत्ती आणि गव्यांनी हैदोस घातला आहे. अलीकडच्या काही वर्षात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढू लागला आहे. गतवर्षी देसूर गावात गवीरेडे आल्याची घटना घडली होती. त्यानंतर येळ्ळूरमध्ये हरीण सापडले होते. त्याबरोबर सांबरा परिसरात तरसचा वावर सातत्याने आढळून आला होता. तर सप्टेंबर दरम्यान शास्त्राrनगर आणि शिवाजीनगर परिसरात कोल्ह्याचा वावर वाढला होता. विशेषत: 2022 ऑगस्ट दरम्यान शहराला लागून असलेल्या रेसकोर्स परिसरात बिबट्या स्थिरावला होता. यावरून वन्यप्राणी शहर आणि ग्रामीण भागातील मानवी वस्तीत येत असल्याचे समोर येऊ लागले आहे. यासाठी वनखात्याने उपाययोजना हाती घेणे काळाची गरज बनली आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर असलेल्या बेकिनकेरे, बसुर्ते, अतिवाड यासह चंदगड तालुक्यातील कौलगे, होसूर, सुंडी परिसरात गवीरेडे, तरस, मोर, साळिंदर आणि रानडुकरांची संख्या वाढली आहे. गावाशेजारी असलेल्या डोंगर परिसरात या वन्यप्राण्यांचा वावर सुरू आहे. डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात या वन्यप्राण्यांचा हैदोस सुरू आहे. त्यामुळे शेतीचेही नुकसान होऊ लागले आहे. आता या वन्यप्राण्यांची मजल भरमानवी वस्तीत गेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ लागली आहे. हत्ती व गवीरेडे मानवी वस्तीत आल्याने नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. कोणताही अनर्थ घडला नसला तरी वनखात्याने गांभीर्य घेणे गरजेचे आहे. केवळ आठ दिवसाच्या कालावधीत हत्ती आणि दोन गवीरेड्यांचा मुक्त संचार गावकऱ्यांनी अगदी जवळून पाहिला आहे. एवढेच नव्हे तर हत्ती भर गावातून फिरून गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती कायम आहे. पंधरा दिवसात शिवारातही शेतकऱ्यांना हत्ती व गव्यांचे सातत्याने दर्शन झाले आहे. त्यामुळे शेताकडे जाणेही धोकादायक बनू लागले आहे. सीमाहद्दीवर डोंगर क्षेत्र आहे. यामध्ये वन्यप्राण्यांचा वावर आहे. रात्रीच्या अंधारात अन्नाच्या शोधात हे वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.

Advertisement

वनक्षेत्रात चारा-पाण्याची कमतरता

उन्हाच्या झळा हळूहळू वाढू लागल्या आहेत. त्यामुळे वनक्षेत्रात चारा आणि पाण्याची कमतरता भासू लागली आहे. दरम्यान, नाईलाजास्तव वन्यप्राण्यांना चारा आणि पाण्याच्या शोधात फिरावे लागत आहे. यातूनच वन्यप्राणी आणि मानव संघर्ष निर्माण होऊ लागला आहे. यासाठी वनखात्याने डोंगर क्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही होऊ लागली आहे.

वन्यप्राणी वाढत्या उन्हामुळे सैरभैर

जंगल आणि वन्यप्राणी ही आपली संपत्ती आहे. त्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वन्यप्राणी वाढत्या उन्हामुळे सैरभैर होऊ शकतात. नागरिकांनी त्यांना हुसकावण्याचा किंवा डिवचण्याचा प्रयत्न करू नये. ते पुन्हा मूळ अधिवासात निघून जातील.

- पुरुषोत्तम रावजी (आरएफओ, बेळगाव)

वन्यप्राणी अन्न-भक्ष्याच्या शोधात सीमाहद्दीत

कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर डोंगर क्षेत्र आहे. यात वन्यप्राण्यांचा वावर आहे. वन्यप्राणी अन्न आणि भक्ष्याच्या शोधात फिरत असतात. सहसा वन्यप्राणी हल्ला करीत नाहीत. कोणीही घाबरून जाऊ नये. वन्यप्राणी आल्या पावलांनी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात निघून जातात.

- प्रशांत आवळे (वनक्षेत्रपाल, पाटणे)

Advertisement
Tags :

.