Satara Crime | आकाशवाणी झोपडपट्टी परिसरात मध्यरात्री दहशत; टोळक्याकडून रस्त्यावरील गाड्यांवर दगडफेक
सातारा :सातारा शहरातील माजगावकर माळ येथील आकाशवाणी झोपडपट्टी परिसरात रविवारी रात्री काही अज्ञात युवकांनी दहशत माजवत वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकांनी परिसरात आरडाओरडा करत गोंधळ घातला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. या घटनेचे चित्रण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्येकैद झाले असून, त्या फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, काही युवकांकडून परिसरात वारंवार दादागिरी व धिंगाणा घालण्याचे प्रकार
घडत असून, अमली पदार्थांचे सेवन करून रात्री उशिरापर्यंत गोंधळ घालण्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, शाहूपुरी पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असतानाही अशा घटना वारंवार घडत असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित युवकांवर कायद्याचा धाक राहिलेला नसल्याचे चित्र दिसत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, वाहनांचे नुकसान झालेल्या नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत तसेच परिसरात पोलीस गस्त वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.