Kolhapur Crime : संभाजीनगरात दहशत; पूर्ववैमनस्यातून तलवार, एडका नाचवत माजविली दहशत
कोल्हापुरात तरुणाच्या घरावर तलवार–एडक्याने हल्ला
कोल्हापूर : तरुणास केलेल्या मारहाणीनंतर त्याला उपचारासाठी नेल्याचा राग मनात धरून ५ जणांच्या टोळक्याने संभाजीनगर येथील नारायणराव सासनेनगर परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. शनिवारी रात्री ८ च्या सुमारास बिअरच्या बाटल्या दारात फोडून, तलवार आणि एडका नाचवत ही दहशत माजविण्यात आली. या प्रकरणी जुना राजबाडा पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबतची फिर्याद ऋतीका सचिन पोतदार (वय २८, रा. सासने नगर, संभाजीनगर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी शर्विन उमेशयादव (वय २०) याला अटक करण्यात आली असून, अन्य चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार ते पाच महिन्यांपूर्वी शर्विन यादव व सासनेनगर येथे राहणाऱ्या आयुष दिक्षीत यांच्यात वाद झाला होता. यातून शर्विन व त्याच्या साथीदारांनी आयुषला बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर फिर्यादी यांचे पती सचिन व दिर किरण यांनी आयुषला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले होते. हाच राग मनात धरून शनिवारी सायंकाळी शर्विन व त्याच्या साथीदारांनी सासनेनगर येथे दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.
घरासमोर फोडल्या बिअरच्या बाटल्या
संशयित आरोपींनी पोतदार यांच्या घरावर हल्ला करत घरासमोर बिअरच्या बाटल्या फोडल्या, तर दारातील वाहनांची तोडफोड केली. हातामध्ये तलवार आणि एडका घेऊन त्यांनी मोपेडची नासधूस केली. सुमारे १० ते १५ मिनिटे हा प्रकार सुरू होता. यानंतर घाबरलेल्या अवस्थेत पोतदार कुटुंबाने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. यानुसार रात्री उशिरा शर्बिन यादव याला अटक करण्यात आली. तर अन्य चार अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास साहाय्यक फौजदार समिर शेख करत आहेत.