For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वातंत्र्यदिनापूर्वी दिल्लीत दहशत

06:38 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्वातंत्र्यदिनापूर्वी दिल्लीत दहशत
Advertisement

लाल किल्ल्यासह अनेक ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी, यंत्रणा सतर्क

Advertisement

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

Advertisement

स्वातंत्र्य दिनापूर्वी राजधानी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्थेची तयारी सुरू असतानाच दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) महापौरांच्या कार्यालयाला एक धमकीचा ईमेल मिळाल्याने घबराट व दहशत पसरली. स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यासह दिल्लीतील अनेक प्रमुख ठिकाणी बॉम्बस्फोट घडवले जातील, असा दावा ईमेलमध्ये करण्यात आला आहे. ही धमकी मिळताच महापौरांच्या कार्यालयाने तात्काळ दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली.

दिल्लीत साजरा होणारा स्वातंत्र्यदिन सोहळा अवघ्या दहा-अकरा दिवसांवर आला असताना हल्ल्याचा इशारा मिळाल्याने सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी मिळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तपासाला गती दिली. खबरदारीचा उपाय म्हणून, महापौरांच्या कार्यालयाच्या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलीस, सायबर टीमच्या मदतीने ईमेल पाठवणाऱ्याची ओळख पटवण्याचे आणि त्याच्या स्रोताचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

शाळांमध्येही बॉम्बस्फोटाचा इशारा

यापूर्वी, राजधानी दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्यामुळे तात्काळ सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या. शाळा रिकाम्या करून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान सर्व मानक सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले आणि बॉम्बनिकामी पथक व स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी बाधित शाळांच्या परिसराची कसून तपासणी केल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

यापूर्वीही धमक्या

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला दिल्ली पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एक निनावी फोन आल्यानंतर मुंबई पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास आलेल्या या फोनमध्ये, एका अज्ञात व्यक्तीने त्या दिवशी मुंबईत बॉम्बस्फोट होईल असा दावा केला होता. ही माहिती मिळाल्यानंतर, महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना, राज्य यंत्रणांसह, सतर्क करण्यात आले. संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, धमकी दिल्यानंतर आरोपीचा मोबाईल फोन बंद करण्यात आला होता. त्यापूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पालाही बॉम्बची धमकी मिळाली होती.

Advertisement
Tags :

.