तुर्कीयेमध्ये दहशतवादी हल्ला, 3 ठार
राजधानी अंकाराजवळील तुर्की एअरोस्पेस मुख्यालय टार्गेट, स्फोटानंतर गोळीबार
वृत्तसंस्था/ अंकारा
तुर्कीयेची राजधानी अंकाराजवळील तुर्की एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या (तुसास) मुख्यालयावर बुधवारी हल्ला झाला. ‘दहशतवादी हल्ला’ असे संबोधत देशाचे गृहमंत्री अली येर्लिकाया यांनी हल्ल्याचा दुजोरा दिला आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून काहींचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भीषण हल्ल्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांमध्ये महिलेसह शस्त्रधारींचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दल, ऊग्णवाहिका आणि अग्निशमन दलासह आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही.
‘तुसास’ मुख्यालयाच्या परिसरात गोळीबारानंतर मोठा स्फोट झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आली. तसेच हल्ल्यावेळची व्हिडिओ फुटेजही दाखविण्यात आले असून हल्लेखोरांचा एक गट टॅक्सीमधून कॉम्प्लेक्समध्ये घुसल्याचे दिसून आले. दहशतवाद्यांपैकी एकाने बॉम्बस्फोट केल्याचे स्पष्ट झाले असून उर्वरित शस्त्रधारी हल्लेखोरांनी गोळीबार करत परिसरात खळबळ माजवली.
असॉल्ट रायफलसह सशस्त्र पुऊष आणि एका महिलेसह हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचे व्हिडिओ फुटेजमध्ये दिसून येत आहे. तसेच शस्त्रधारी हल्लेखोरांनी काही लोकांना ओलीस ठेवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हल्ल्याचे नेमके कारण आणि स्वरूप अस्पष्ट असले तरी काही माध्यमांनी आत्मघाती बॉम्बस्फोट झाल्याचेही म्हटले आहे.