रशियात भीषण दहशतवादी हल्ला
मृतांची संख्या वाढून 195 पर्यंत, आयएसआयएसने स्वीकारली जबाबदारी
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाची राजधानी मॉस्को येथील क्रोकस शहर सभागृहात एका म्युझिकल कॉन्सर्टवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात किमान 195 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्लामी दहशतवादी संघटना आयएसआयएसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. रशियाच्या प्रशासनाने हल्ल्यानंतर केलेल्या कारवाईत चार हल्लेखोरांसह 11 जणांना अटक केली आहे. अलिकडच्या काळातील हा जगातला सर्वात भयानक दहशतवादी हल्ला म्हणून ओळखला जात आहे. हल्ल्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वत्र या हल्ल्याचा निषेध होत आहे.
हा हल्ला शुक्रवारी मध्यरात्री भारतीय प्रमाणवेळेनुसार साधारणत: 1 वाजता करण्यात आला. हल्लेखोरांनी स्वत:चे चेहरे झाकलेले होते. त्यांनी स्वयंचलित बंदुका आणि रायफल्स यांच्या साहाय्याने एका संगीत कार्यक्रमाला येत असलेल्या लोकांवर अचानक अंदाधुंद गोळीबार केला. साधारणत: 15 मिनिटे चाललेल्या या गोळीबारात अनेक संगीतप्रेमी बळी पडले. 50 हून अधिक जण जागीच ठार झाले. तर 154 पेक्षा जास्त लोक गंभीररित्या जखमी झाले. जखमींपैकी अनेकांचा शनिवारी संध्याकाळपर्यंत अंत झाला होता. मृतांची संख्या अद्यापही वाढण्याची शक्यता आहे. हा क्रूर आणि मानवतेला काळीमा फासणारा हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी व्यक्त केली आहे.
जगभरातून निषेध
इस्लामी दहशतवादी संघटनेने केलेल्या या हल्ल्याचा जगातील जवळपास सर्व देशांनी निषेध केला आहे. अमेरिकेने हा अत्यंत निर्घृण आणि निर्दय हल्ला असल्याचे प्रतिपादन केले असून दहशतवाद आजही डोके वर काढत असल्याच्या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. फ्रान्स, चीन, जर्मनी, जपान, ब्रिटन, इटली, कॅनडा, भारत आदी देशांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे.
युक्रेनशी संबंध ?
या हल्ल्याचा संबंध युक्रेनशी आहे, असा आरोप रशियाने केला आहे. आयएसआयएस या संघटनेच्या काही गटांना युक्रेनमध्ये आश्रय देण्यात आला असून त्यांनी या हल्ल्याचा कट त्याच देशात रचला, अशी माहिती गुप्तचरांनी दिल्याचे प्रतिपादन रशियाच्या प्रशासनाने दिले आहे. या संदर्भात आतापर्यंत पकडलेल्या दहशतवाद्यांकडे आणि हल्लेखोरांकडे चौकशी केली जात आहे.
कार ताब्यात
संगीत कार्यक्रमाच्या सभागृहाजवळ जाण्यासाठी दहशतवाद्यांनी उपयोगात आणलेली कार मॉस्को पोलिसांनी जप्त केली आहे. या कारमध्ये दोन पिस्तुले, एक रायफल, अनेक काडतुसे आणि दोन मॅग्झिन्स सापडल्याची माहिती देण्यात आली. या कारचीही तपासणी केली जात आहे. हल्लेखोरांची संख्या चार ते पाच होती. घटनास्थळावरुन पळून जाण्यात ते प्रथम यशस्वी ठरले. मात्र, नंतर चार जणांना अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आणि सात जणांना अटक करण्यात आली. रशियात कार्यरत असणारे सर्व दहशतवादी गट कठोरपणे संपविण्यात येतील, अशी घोषणा रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी केली आहे.
सभागृहात घुसूनही हल्ला
हल्लेखोरांनी केवळ बाहेर गोळीबार केला असे नाही, तर सभागृहात बसलेल्या लोकांनाही आपले लक्ष्य बनविल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यासाठी बंदुकांसमवेत हातगोळ्यांचाही उपयोग करण्यात आला. अत्याधुनिक स्फोटकांचाही उपयोग झाला. या घटनेनंतर सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी रक्तामांसाचा चिखल आणि अवयवांचे तुकडे सांडल्याच दिसून येत होते. गोळीबाराला प्रारंभ होताक्षणीच अनेक दर्शकांनी खुर्च्याखाली आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीजणांचे प्राण वाचले, अशी माहिती देण्यात आली. हल्ल्यानंतर या संपूर्ण भागाची नाकेबंदी करण्यात आली होती. तसेच मृतांची ओळख पटविण्यासाठी प्रशासनाची धडपड चालली होती. राजधानीच्या शहरात असा हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवरही नागरीकांकडून शंका व्यक्त केली जात आहे.
उद्देश काय होता ?
या दहशतवादी हल्ल्याचा उद्देश काय होता, या संबंधी चर्चा होत आहे. रशियात बऱ्याच काळानंतर इतका मोठा हल्ला झाल्याचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. सध्या रशिया युक्रेन युद्धामुळे प्रकाशात आहे. आता या दहशतवादी हल्ल्याची त्यात भर पडली आहे. या हल्ल्याचा संबंध सध्या निष्क्रिय वाटणाऱ्या चेचन दहशतवाद्यांशीही जोडण्यात येत आहे. स्पष्ट चित्र चौकशीनंतरच समोर येईल, अशी शक्यता आहे. प्रशासनाने नागरीकांना शांततेचे आवाहन केले आहे.
दहशतवादाचा मुद्दा पुन्हा जागृत
ड इस्लामी संघटनेने जबाबदारी स्वीकारल्याने दहशतवादाचा मुद्दा पुन्हा चर्चेत
ड मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती, अद्यापही कित्येक गंभीर अवस्थेत
ड दहशतवादाची पाळेमुळे खणून काढण्याचा रशियाच्या प्रशासनाने केला निर्धार
ड हल्ल्याचा जगभरातून निषेध, भारतानेही व्यक्त केली तीव्र शब्दात प्रतिक्रिया