मालीमध्ये भीषण दहशतवादी हल्ला, संरक्षणमंत्री ठार
बॉम्बस्फोटांनी हादरली अनेक शहरे : राजधानी बामाको नजीकचा सैन्यतळही लक्ष्य
वृत्तसंस्था/ बामाको
माली या देशात अत्यंत भीषण दहशतवादी हल्ला झाला आहे. अल-कायदाशी संबंधित दहशतवादी संघटना अणि तुआरेग बंडखोरांनी मिळून देशाच्या अनेक हिस्स्यांवर एकाचवेळी हल्ले केले. या हल्ल्यांमध्य देशाचे संरक्षणमंत्री सादियो कॅमारा यांचा मृत्यू झाला आहे.
जेएनआयएम अणि तुआरेग बंडखोरांनी मिळून एकाचवेळी अनेक ठिकाणांवर हल्ले केले. हा हल्ला अनेक वर्षांमधील सर्वात मोठा आणि सर्वात संघटित हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. राजधानी बामाकोनजीक, सोन्याच्या खाणी असलेले भाग आणि देशाच्या विविध हिस्स्यांमध्ये एकाचवेळी हल्ले झाले आहेत.
जेएनआयएमच्या दहशतवाद्यांनी बामाकोच्या बाहेर स्थित काटी सैन्यतळावर हल्ला केला. याच ठिकाणी मालीचे संरक्षणमंत्री सादियो कॅमारा राहत होते. त्यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यात त्यांना जीव गमवावा लागला आहे.
किडाल शहरात काय घडले?
मालीमध्ये किडाल हे अत्यंत महत्त्वपूर्ण शहर आहे. किडाल हे दीर्घकाळापासून सरकार आणि बंडखोरांमधील संघर्षाचे केंद्र राहिले आहे. किडाल शहराला सरकारच्या सैन्यापासून मुक्त करविले असल्याचा दावा बंडखोरांनी केला आहे. परंतु या दाव्याची अद्याप पूर्णपणे पुष्टी झालेली नाही.
हल्ल्यांची तीव्रता
दहशतवादी संघटनेचे हे हल्ले अत्यंत धोकादायक मानण्यात येत आहेत, कारण पूर्वी दहशतवादी दुर्गम भागांमध्ये हल्ले करत होते, परंतु यावेळी त्यांनी राजधानी बामाकोच्या नजीक आणि एका सैन्यतळावर हल्ला केला आहे. तसेच संरक्षणमंत्र्यासारख्या मोठ्या नेत्याला लक्ष्य केले आहे. अनेक ठिकाणी एकाचवेळी झालेले हल्ले पाहता हा अत्यंत सुनियोजित कट होता असे स्पष्ट होते.
मालीमध्ये दीर्घकाळापासून संघर्ष
माली हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. या देशात अनेक वर्षांपासून दहशतवादी संघटना आणि बंडखोर गट सरकारच्या विरोधात लढत आहेत. मालीमध्ये सध्या सैन्य राजवट आहे, या राजवटीच्या विरोधात जेएनआयएम ही अल-कायदाशी निगडित दहशतवादी संघटना तसेच तुआरेग बंडखोर उभे ठाकले आहेत. या बंडखोरांना उत्तर मालीमध्ये स्वत:ची वेगळी सत्ता हवी आहे.