अमेरिकेचा सैन्यतळ ‘टॉवर 22’वर भीषण हल्ला
इराणवर प्रतिहल्ला केला जाण्याची शक्यता : तणावात मोठी भर
वृत्तसंस्था/ तेल अवीव
जॉर्डनमध्ये सीरियाच्या सीमेनजीक अमेरिकेचा सैन्यतळ टॉवर 22 वर भीषण ड्रोन हल्ला झाल्यावर आखाती देशांमधील स्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. इराकच्या इस्लामिक रेजिस्टेंस ग्रूपने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात अमेरिकेचे तीन सैनिक मारले गेले असून अनेक जण जखमी झाले आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध झाल्यावर पहिल्यांदाच कुठल्याही अमेरिकेच्या सैनिकाचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. इराकच्या या इस्लामिक गटाला इराणचे समर्थनप्राप्त असल्याचे मानले जाते. याचमुळे आता अमेरिकेकडून इराणवर प्रत्युत्तरादाखल हल्ला होण्याची शक्यता बळावली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या सैन्यतळावर हल्ला करणाऱ्या गटाला आपण समर्थन देत नसल्याचा दावा इराणने केला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी इराणचे समर्थनप्राप्त गटाला या हल्ल्यासाठी जबाबदार ठरविले आहे. अशाप्रकारची वक्तव्यं क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थैर्याला धोका निर्माण करत असल्याचे इराणच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते नासीर कनानी यांनी म्हटले आहे. ड्रोन हल्ल्यात 3 सैनिकांचा मृत्यू झाला असून 34 सैनिक जखमी झाल्याची माहिती अमेरिकेच्या सैन्याकडून देण्यात आली आहे.
अमेरिकेच्या सैन्याचा हा तळ जॉर्डनमध्ये इराक आणि सीरियाला लागून असलेल्या सीमेनजीक आहे. इराणला कठोर संदेश देण्याच्या उद्देशाने अमेरिकेकडून मोठा हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर बिडेन प्रशासन थेट इराणच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करू शकते.
इराणला बिडेन यांचा इशारा
2020 मध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावर अमेरिकेच्या सैन्याने इराणचे सर्वोच्च जनरल कासिम सुलेमानी यांना इराकमध्ये ठार केले होते. याच धर्तीवर अमेरिकेकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. गाझा युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई अमेरिका करणार असल्याचे मानले जातेय. इराण आणि त्याच्या सहकारी गटांनी पुन्हा हल्ला करण्याचे दुस्साहस करू नये या दृष्टीने बिडेन प्रशासनाकडून निर्णय घेतला जाऊ शकतो. अशा स्थितीत अमेरिका आणि इराण यांच्यात थेट संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी बिडेन यांनी इराणचे समर्थनप्राप्त दहशतवाद्यांचा या हल्ल्यामागे हात असल्याचा आरोप केला होता.