Kolhapur Highway Road Accident | कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर भीषण अपघात; तरुण डॉक्टरचा जागीच दुर्दैवी मृत्यू!
भीषण अपघातात तरुण डॉक्टरांचा जागीच मृत्यू
पन्हाळा -कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील मरळी (ता. पन्हाळा) येथे झालेल्या ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात कारमधील तरूण डॉक्टर जागीच ठार झाला. डॉ. सुनील नंदगावकर (वय २९, रा. मणदूर पैकी धुमाळवाडी, ता. गगनबावडा) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. आज पहाटे दीडच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून ट्रक चालक संतोष विठ्ठल पाटील (वय २७, रा. गुडमाकेरी, ता. सौंदती, जि.बेळगांव) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबतची माहिती अशी, करूळ घाटमार्गे कोल्हापूरवरून सौंदती, जि. बेळगावकडे निघालेला चिऱ्याने भरलेला ट्रक आणि कोल्हापूरवरून मणदूर पैकी धुमाळवाडीकडे (ता. गगनबावडा) निघालेली कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत डॉ. नंदगावकर हे जागीच ठार झाले. अपघातानंतर सोळा चाकी ट्रक रस्त्यावरून सुमारे दहा फूट खाली गेला.तर आलिशान कारचे मोठे नुकसान झाले.
अपघातातील मृत डॉ. सुनील सुरेश नांदगावकर यांचा साळवण (ता. गगनबावडा) येथे दवाखाना आहे. शिवाय ते कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात सेवा बजावत होते. सोमवारी रात्री दीडच्या सुमारास ते ड्युटीवरून घरी परतत असताना दीडच्या सुमारास हा अपघात झाला.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचे वडील सुरेश नांदगावकर यांनी आपल्या मुलाला वैद्यकीय शिक्षण दिले होते. डॉ. सुनील यांनीही वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत वैद्यकीय शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून साळवण येथे दवाखाना सुरु केला होता. अत्यंत मनमिळावू व तरुण डॉक्टरांच्या मृत्यूने साळवण परिसरासह गगनबावडा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.