Kolhapur Crime : कागल-निढोरी मार्गावर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू
बामणी फाटा येथे जेसीबी कामाच्या ठिकाणी अपघात,
कागल : कागल-निढोरी मार्गावरबामणी फाटा येथे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. चंद्रशेखर चव्हाण (वय ३०, रा. विजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
चंद्रशेखर चव्हाण हा जेसीबी मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करत होता. सध्या तो सिद्धनेर्ली येथे भाड्याने राहत होता. तो लमाण समाजातील असून या परिसरात त्याच्या समाजातील अनेक लोक वास्तव्यास आहेत.कागल-निढोरी रस्त्याच्या कडेला मोबाईल केबल टाकण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने चर खोदण्याचे काम सुरू होते.
खोदकामातून निघालेला मुरूम रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला होता. राठोड यांच्या गाडीवरून चंद्रशेखर हा शेंदूरकडे चालला होता. यावेळी एका वळणावर मुरुमावरून मोटारसायकल घसरल्याने दोघेजण रस्त्यावर पडले. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने चंद्रशेखर चव्हाण याचा मृत्यू झाला. राठोड किरकोळ जखमी झाला आहे.