For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Shiroli Toll Naka Accident | कोल्हापूर जुन्या पंचगंगा पुलाजवळ भीषण थरार; संरक्षक कठडा तोडून कार थेट खाली, एकाचा मृत्यू

11:15 AM Jun 04, 2026 IST | NEETA POTDAR
shiroli toll naka accident   कोल्हापूर जुन्या पंचगंगा पुलाजवळ भीषण थरार  संरक्षक कठडा तोडून कार थेट खाली  एकाचा मृत्यू
Advertisement

                          पंचगंगा पुलाजवळ भीषण अपघात; कार ३० फूट खाली कोसळून युवक ठार

Advertisement


कोल्हापुर
-तावडे हॉटेल ते शिरोली टोलनाका दरम्यान जुन्या पंचगंगा पुलाजवळील संरक्षक कठडा तोडून तवेरा कार ३० फूट खाली कोसळली. बुधवारी सायंकाळी झालेल्या या अपघातात दुर्गाप्रसाद हुवाप्पा ईटी (वय २६, रा. कावळा नाका, मूळ रा. लोकापूर, कर्नाटक) हा जागीच ठार झाला. तर कारमधील रोहित माने, रोहित जोंधळे आणि अर्जुन चौगुले हे जखमी झाले. जखमींवर कदमवाडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दुर्गाप्रसाद ईटी मोटार मेकॅनिक आहे. तो १५ वर्षापासून कावळा नाका येथील बहिणीकडे राहण्यास होता. बुधवारी दुपारी कामानिमित्त तीन मित्रांसोबत तो गांधीनगरला गेला होता.तिकडून कावळा नाक्याकडे येताना तावडे हॉटेलपासून काही अंतरावर जुना जकात नाक्याशेजारील पुलाजवळ चालकाचा ताबा सुटला आणि कार बाजूच्या संरक्षक कठड्याला धडकून बेरीकेटस् कठडा तोडून सुमारे ३० फुटांवरून खाली कोसळली.

Advertisement

कारचा चक्काचूर, चालक जागीच ठार
मुख्य मार्गावर वाहनांची गर्दी असतानाच झालेल्या या अपघाताने वाहनधारकांचीही तारांबळ उडाली. नेमके काय घडलेय, हे पाहण्यासाठी अनेकांनी वाहने थांबवून मदतीसाठी धाव घेतली. बाजूच्या उतारावरून उतरून अनेकजण अपघातग्रस्त कारपर्यंत पोहोचले. परंतु, उंचावरून कोसळल्याने मोटारीचा चक्काचुर झाला. कारमधील दुर्गाप्रसाद ईटी जागीच ठार झाला.

अपघाताची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृताच्या खिशातील कागदपत्रांआधारे नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईकांनीही अपघातस्थळी धाव घेतल्याने गर्दी वाढली. बचाव कार्यात काही प्रमाणात अडथळे आले. पण, पोलिसांनी जखमींना तातडीने उपचारासाठी कदमवाडीतील खासगी रुग्णालयात हलवले.

एकाची प्रकृती गंभीर
कार जवळपास ३० फुटांवरून कोसळल्याने आतील अन्य तिघे गंभीर जखमी झाले. बरगडीला, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अर्जुन चौगुलेची प्रकृती गंभीर आहे. तर अन्य दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना कारमधून बाहेर काढून मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी कसरत करावी लागली. पण, तिघांना वेळेवर उपचार मिळवून देण्यात यश आले.

नातेवाईकांचा आक्रोश
नेमके काय घडले, हे पाहण्यासाठी कावळा नाका येथील महिलाही घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातग्रस्त कार पाहूनच महिलांनी आक्रोश केला. दुर्गाप्रसादचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या बहिणीसह नातेवाईकांनी सीपीआर आवारात आक्रोश केला. दुर्गाप्रसादच्या मित्रांनाही अश्रू अनावर झाले होते.

Advertisement
Tags :

.