येळावीत भीषण अपघात, चालक जागीच ठार
तासगाव :
तुरची कारखाना ते पाचवा मैल मार्गावर येळावीचे हद्दीत सोमवारी भिषण अपघात झाला. भरधाव वेगात धावणाऱ्या फॉरच्युनर गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी होऊन चालक जागीच ठार झाला. गाडी सर्व्हिसिंगसाठी घेऊन जात असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. अपघाताचे वृत्त समजताच नागराळे परिसरात शोककळा पसरली होती.
धैर्यशिल संभाजी पाटील-35 रा. नागराळे, ता. पलूस असे या अपघातात ठार झालेल्या चालकांचे नांव आहे. पाटील हे सुमारे 20 वर्षापासून चालक म्हणून नोकरी करीत होते. तर सुमारे सात वर्षापासून पलूस येथील एका दुकान मालकांच्या गाडीवर चालक म्हणून ते नोकरी करीत होते. सोमवारी सकाळी ते दुकान मालकांची फॉरच्युनर गाडी क्रमांक एम एच-10 बी एम-0011 ही सर्व्हिसिंगसाठी घेऊन पलूसहून सांगलीकडे निघाले होते. 9.30 च्या दरम्यान ते गाडी घेऊन येळावी गावचे हददीत, तुरची कारखाना ते पाचवा मैल मार्गावरील नायरा पेट्रोल पंप व यशवंत कोळसा पॅक्टरी यांच्यामध्ये आले. भरधाव वेगातील गाडीवरील त्यांचा ताबा या ठिकाणी सुटला आणि रस्त्याच्या डावे बाजूने सुमारे 55 फुट अंतरावर शेतात जाऊन ही गाडी पलटी झाली. यामध्ये धैर्यशिल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती तासगांव पोलिसात निनावी फोन वरून देण्यात आली. पो.हे.कॉ. दिपक कुंभार, जयराम चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.तर अपघात स्थळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड, पै. चंद्रहार पाटील, मा.जि.प.सदस्य संजय पाटील, पै.रणजित निकम यांनी भेट दिली. तर पलूस, नागराळे येथील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तासगांव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.