महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तेरी भी चूप... मेरी भी चूप...

12:50 PM Nov 22, 2024 IST | Pooja Marathe
Teri bhi chup... Meri bhi chup...
Advertisement

पंधराशे, दोन हजार या शब्दाचा खेळ...

Advertisement

लोकशाहीप्रेमी नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया

Advertisement

कोल्हापूर/ सुधाकर काशीद

तुमच्याकडे किती? आमच्याकडे किती? हा प्रश्न मतदानाच्या टक्केवारीसाठी प्रचलित होता. पण आता टक्केवारीपेक्षा तुमच्याकडे पंधराशे, आमच्याकडे दोन हजार हाच शब्द कालपासून सर्वत्र प्रचलित झाला. पंधराशे म्हणजे काय? दोन हजार म्हणजे काय? पाकीट म्हणजे काय? हे ठराविकांना फार समजावून सांगावे लागले नाही. लोकशाहीत आपले मत अमूल्य आहे, असे वर्षानुवर्षे आपण ऐकतो. पण पंधराशे- दोन हजारांचा हा चर्चेतला शब्द मतदानाचे अवमूल्यन करून गेला. या परिस्थितीला बदलत्या राजकारणाचा प्रवाह जसा जबाबदार राहिला, तसा पंधराशे 2 हजारांची प्रतीक्षा करणारा ‘जागरूक’ मतदारही नक्कीच कारणीभूत ठरला. त्यामुळे चांगल्या माणसाला निवडून द्या, असे सांगण्यापेक्षा हजार पंधराशेचा नाद सोडा, लोकशाही वाचवा . असे मतदारांना हात जोडून सांगण्याची इथून पुढे वेळ येणार आहे .
निवडणूक प्रचाराच्या काळात किंवा निवडणुकीअगोदर उमेदवाराकडून विकासकामे त्याच्या मानगुटीवर बसून करून घेण्यात नक्कीच कोणतीही चूक नाही. किंवा ठोस विकासाचे आश्वासन उमेदवारावर दबाव आणून घेण्यातही काही गैर नाही. कारण त्यातून सार्वजनिक हिताचीच कामे घडत असतात. उमेदवार मताच्या आशेने का होईना, अशी दबावाने पुढे आलेली कामे करत असतात आणि त्या बळावर ते आग्रहाने मतदानही मागत असतात. अशा व्यवहारात नक्कीच काही गैर नाही.
पण कोट्यावधीची कामे करूनही निवडणुकीच्या आधी दोन दिवस हजार, पंधराशे आणि पाकिट या शब्दाने खूप ताकद दाखवली. आपण आपल्या कामावर निवडून येऊ, या समजुतीत असलेल्या उमेदवारांनाही या शब्दाने धडकी भरवली. पण खिंडीत गाठल्यासारखी काही उमेदवारांची परिस्थिती झाली आणि ‘तेरी भी चूप मेरी भी चूप..’ म्हणत या शब्दाची पूर्तता करण्याची काही ठराविक मतदारसंघात वेळ आली. मतदान हा आपला अमूल्य हक्क आहे, अशी तात्विक चर्चा करणाऱ्या स्वत:ला जागरूक समजणाऱ्या सुशिक्षित मतदारांकडूनही या अशा पाकिटाची अपेक्षा व्यक्त होऊ लागली आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन अपेक्षा पूर्ण करावी लागली, अशी चर्चा रंगली.
कोल्हापुरात हे पूर्वी घडत नव्हते, असे नाही. पण त्याचे प्रमाण कमी होते. आता मात्र ही पद्धत रूढ झाल्यासारखे वातावरण झाले. जेवणावळीने तर लोकशाहीचे अपचन झाले. जेवणावळ म्हणजे पंगत, पाणी वाढवलेला रस्सा, पंगतीला एकदाच मटणाची वाटी, नळी पद्धत बंद हा असल्या अटी घालायचा, प्रकारही बंद झाला. चांगल्या कॅटरर्सकडून तयार करून घेतलेल्या जेवणाच्या पंगतीवर पंगती उठल्या. जे पंगतीत बसणार नाहीत, त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये जोडण्या झाल्या. पंगतीत ताव मारताना लोकशाही मतदानाचे महत्त्व मतदानाची ताकद या बाबी काही काळासाठी खुंटीवर टांगून ठेवल्या आणि एवढे करूनही वर पंधराशे-दोन हजारांच्या अपेक्षा केल्या गेल्या.
संपूर्ण कोल्हापूर यात सामील होते का? अजिबात नाही. पण मोठा प्रभाव असलेले गट यात सहभागी झाले. आपली किंमत फक्त पंधराशे, दोन हजार आणि अनलिमिटेड थाळी एवढीच आहे, हे सिद्ध करून गेले. पण त्यातही चांगले झाले. अनेक मतदारांनी अशा पंधराशे, दोन हजारांची अपेक्षा तर केली नाहीच, पण दारात पाकीट घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनाही थांबू दिले नाही. या साऱ्या वातावरणात मतदानाची टक्केवारी किती, यापेक्षा आमच्याकडे पंधराशे, दोन हजार तुमच्याकडे किती? असलीच लोकशाहीचा अवमान करणारी संतापजनक चर्चा खूप रंगली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article