युनूस सरकारच्या हिंसक धोरणांमुळेच भारतासोबत तणाव
दिल्ली
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी स्वत:च्या देशातील अंतरिम सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मोहम्मद युनूस यांच्या हिंसक आणि कट्टरतावादी धोरणांमुळेच भारतासोबत तणाव निर्माण झाला आहे. अवामी लीगवर निवडणुकीत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे, हा प्रकार देशाच्या घटनेचे उल्लंघन करणारा आहे. यामुळे अवामी लीगचे समर्थक आगामी निवडणुकीत भाग घेणार नाहीत असे शेख हसीना यांनी म्हटले आहे. ऑगस्ट 2024 मध्ये पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागल्यावर शेख हसीना या भारतात आश्रयास आहेत.
युनूस यांच्या सरकारच्या काळात कट्टरतावाद्यांना संरक्षण मिळत असल्याने बांगलादेश आणि भारताच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. तर मला सुरक्षित आश्रय पुरविल्याबद्दल मी भारतीय लोकांची आभारी असल्याचे शेख हसीना यांनी म्हटले आहे.
भारत बांगलादेशचा सर्वात महत्त्वपूर्ण सहकारी आहे आणि भविष्यातही तो राहणार आहे. बांगलादेशची सुरक्षा आणि समृद्धी कायम ठेवायची असल्यास भारतासोबत सौहार्दपूर्ण संबंध आवश्यक आहेत. मोहम्मद युनूस यांच्या शासनाच्या अंतर्गत निर्माण झालेले अराजक तसेच हिंसक आणि कट्टरतावादी धोरणांमुळे भारतासोबत निर्माण झाला आहे. यात बांगलादेशात धार्मिक अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे दोन्ही देशांचे संबंध मधूर राहिलेले नाहीत, असा दावा शेख हसीना यांनी केला आहे.
बांगलादेशात माझ्याविरोधात करण्यात आलेले आरोप हे कांगारू न्यायालयाचे कृत्य आहे. घटनाबाह्या मार्गाने सत्तेवर आलेल्या लोकांचा हा कट आहे. मोहम्मद युनूस हे कुठल्याही बांगलादेशी नागरिकाच्या मताने सत्तेवर आलेले नाहीत. या सरकारमध्ये उत्तरदायित्व किंवा योग्य प्रक्रियेसाठी कुठलाच सन्मान नाही. बांगलादेशातील सर्वात जुन्या आणि लोकप्रिय पक्षालाच निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखण्यात आल्याने लोकशाहीची अपेक्षाच राहत नसल्याचे उद्गार शेख हसीना यांनी काढले आहेत.