पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर वाढला तणाव
पाक सैन्याने तैनात केले रणगाडे : अफगाण चौक्यांवर डागले बॉम्ब
वृत्तसंस्था/क्वेटा
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सैन्यांदरम्यान गुरवारी पुन्हा तणाव भडकला आहे. दोन्ही देशांच्या सैन्याने अफगाणिस्तानच बरमाचा सीमा क्षेत्रात परस्परांवर गोळीबार केला आहे. हा भाग पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताच्या समांतर आहे. नव्या चौक्या निर्माण करण्यात आल्याने हा वाद निर्माण झाला आहे. अफगाणिस्तानच्या हेलमंड प्रांताच्या अंतरिम प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी देखील या संघर्षाची पुष्टी दिली आहे. पाकिस्तानच्या सैन्याने या संघर्षादरम्यान रणगाडे तैनात केले असूफ अफगाण सीमेवर उभारलेल्या चौक्यांना लक्ष्य केले आहे.
पाकिस्तान अन् अफगाणिस्तान कट्टर शत्रू
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सध्या परस्परांचे कट्टर शत्रू ठरले आहेत. दोन्ही देश परस्परांच्या सैनिकांच्या मृत्यूनंतर जल्लोष करतात. अफगाण तालिबान समर्थक -टीटीपी पाकिस्तानच्या सैन्यचौक्यांवर कब्जा करत आहेत. टीटीपीला अफगाण तालिबान आश्रय देत असल्याचा आरोप पाकिस्तान करत आहे. तर तालिबानने डूरंड रेषेला अमान्य ठरवत पाकिस्तानला लागून असलेली सीमारेषा मानण्यास नकार दिला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
5 महिन्यांपूर्वी झाली होती हिंसा
सुमारे 5 महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या बाजौर येथील सैन्यतळावर टीटीपीने स्वत:चा झेंडा फडकविला होता. तर 28 डिसेंबर रोजी अफगाण-तालिबानने पाकिस्तानच्या सीमावर्ती भागांमध्ये जोरदार हल्ले केले होते. यात टीटीपीने तालिबानला साथ दिली होती. या हल्ल्यात पाकिस्तानचे 19 सैनिक मारले गेले होते. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे सरकार हादरून गेले होते. ज्या तालिबानला पाकिस्तानचे सैन्य इतकी वर्षे मदत करत राहिले, तोच आता पाकिस्तानसाठी समस्या ठरल्याचे उद्गार पाक विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या जहरा बलोच यांनी काढले होते.