एक इसम बेपत्ता झाल्याने इंफाळमध्ये पुन्हा तणाव
सुरक्षा दलांकडून शोधमोहीम हाती
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये मागील दीड वर्षांपासून हिंसक घटना घडत आहेत. कांगपोकपीच्या सीमेला लागून असलेल्या पश्चिम इंफाळमध्ये एक 55 वर्षीय इसम 24 तासांपेत्रा अधिक काळापर्यंत बेपत्ता राहिल्याने मंगळवारी तणाव वाढला आहे. लैशराम कमलबाबू सिंह असे या बेपत्ता झालेल्या इसमाचे नाव आहे. कांगपोकपीच्या लीमाखोंग आर्मी कॅम्पमध्ये काम करण्यासाठी ते घरातून बाहेर पडले होते आणि तेव्हापासूनच ते बेपत्ता आहेत. त्यांचा मोबाइल फोन देखील बंद आहे.
लैशराम यांना शोधण्यासाठी पोलीस आणि सैन्याने मोहीम हाती घेतली आहे. कमलबाबू हे इंफाळपासून 16 किलोमीटर अंतरावरील कुकीबहुल क्षेत्रांनी वेढलेल्या लीमाखोंग आर्मी कॅम्पमध्ये नोकरी करत होते. मागील वर्षी मे महिन्यात हिंसा सुरू झाल्यावर मैतेई समुदायाच्या लोकांनी या भागातून पलायन केले होते अशी माहिती कमलबाबू यांच्या परिवाराने दिली आहे.
कमलबाबू यांना शोधण्यासाठी गावातून मोठ्या संख्येत लोक लीमाखोंगच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांना कांटो सबलनजीकच रोखले आहे. पोलिसांकडून रोखण्यात आल्यावर जमावाने रस्त्यावरील वाहतूकच रोखली आहे. लीमाखोंगच्या रस्त्यावर बॅरिकेडिंग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.