जिल्ह्यात हुडहुडी वाढली
कोल्हापूर :
जिल्ह्यात थंडीची हुडहुडी वाढली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पारा घसरत असुन थंडीचा कडाका वाढत आहे. शुक्रवारी किमान तापमान 16 अंश डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचले होते. तर कमाल तापमान 29 अंश डिग्री सेल्सियसची नेंद हवामान खात्याकडे झाली असुन डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका किंचित कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
शुक्रवारी दिवसभर हवेत गारठा जाणवत होता. पहाटे धुके व थंडीचा सामना करत नागरिक मॉर्निंग वॉकला येत आहेत. कडाक्याच्या थंडीत दूध, पेपर व भाजी विक्रेत्यांसह कामासाठी बाहेर पडणारे नागरिक उबदार कपडे, कानटोपी, हातमोजे परिधान केलेले दिसत आहेत. सकाळी 10 वाजेपर्यंत बोचरी थंडीचा सामना करावा लागत आहे. सायंकाळनंतर गारठा वाढत आहे.
गुरूवारी किमान तापमान 15.5 अंशावर होते. शुक्रवारी यामध्ये वाढ होऊन किमान तापमान 16 अंश डिग्री सेल्सियसवर पोहचले होते. डिसेबरच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमान 17 ते 19 अंश डिग्री सेल्सियसपर्यंत वाढणार असुन हवेतील गारठा थोडा कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.