भारत-मालदीवच्या संबंधात तणाव! मालदीव सरकारची तीन मंत्र्यांवर निलंबनाची कारवाई
अनेक भारतीयांनी केली पर्यटन सफर रद्द : बहिष्कारामुळे मालदीवची अर्थव्यवस्था संकटात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारताबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर द्विपक्षीय संबंधात तणाव निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. मालदीव सरकारने तीन मंत्र्यांवर निलंबनाची कारवाई केली असली तरी राजनयिक पातळीवर अधिकारी या मुद्द्यावर वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करत आहेत. भारताचे उच्चायुक्तांनी सोमवारी मालदीवमधील परराष्ट्र मंत्रालयात जात पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणीचा मुद्दा उपस्थित केल्याचे समजते. याचदरम्यान सोशल मीडियावर मालदीवविरोधी ट्रेंड सुरू झाला असून हजारो भारतीयांनी मालदीमध्ये केलेले पर्यटन बुकिंग रद्द केल्याचेही निदर्शनास येत आहे. मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून असून त्यामध्ये भारतीयांचा वाटा सर्वाधिक असल्याने तेथील अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होऊ शकतो.
मालदीवच्या मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप भेटीची छायाचित्रेही होती. त्यानंतर दोन्ही देशांमधील राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री मलशा शरीफ, मरियम शिउना आणि अब्दुल्ला महजूम मजीद यांना मालदीव सरकारने निलंबित केले आहे. गेल्या वर्षापर्यंत मालदीवची गणना भारताच्या चांगल्या मित्रांमध्ये होत होती. गेल्यावषी ऑक्टोबरमध्ये मोहम्मद मुइझ्झू राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडू लागले होते. मात्र नुकत्याच घडलेल्या या प्रकरणामुळे भारतातील लोकांमध्येही संताप निर्माण झाला आहे. गेल्यावषी ऑक्टोबर महिन्यात या देशात मुइझ्झू यांचे सरकार सत्तेवर आले. आपण सत्तेवर येताच चीनचे समर्थक समजल्या जाणाऱ्या मुइझ्झू यांनी सर्वप्रथम भारतीय सैनिकांना आपल्या देशातून काढून टाकण्याची घोषणा केली. आता पुन्हा या देशांमधील संबंध बिघडू लागले. मोहम्मद मुइझ्झू हे चीन समर्थक असल्याची चर्चा असतानाच आता भारतावरील टीकेमुळे येथील सरकारसमोर स्वत:ची प्रतिमा सुधारण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
दुतावास पातळीवर चर्चा
मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या मुद्यावरून मालदीवमधील भारताचे उच्चायुक्त मुनू महावर यांनी सोमवारी मालदीवच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात नियुक्त राजदूत डॉ. अली नसीर मोहम्मद यांची भेट घेतली. द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या भेटीत झालेल्या चर्चेची सविस्तर माहिती देण्यात आली नसली तरी भारतासंबंधी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचा मुद्दा भेटीच्या केंद्रस्थानी असल्याची चर्चा आहे.
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष चीन दौऱ्यावर
एकीकडे भारत-मालदीव यांच्यात ठणाठणी सुरू असतानाच मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू 8 जानेवारीला चीनला पोहोचले आहेत. यादरम्यान शी जिनपिंग आणि मुइझ्झू यांची भेट होणार असून द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा अपेक्षित आहे. दोन्ही नेते अनेक करारांवर स्वाक्षऱ्याही करणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मुइझ्झू यांचा हा दौरा चार दिवसांचा असल्याचेही सांगण्यात आले.