लॉस एंजिलिसमध्ये तणाव कायम
अतिरिक्त 2000 नॅशनल गार्ड्स तैनात : 700 मरीन कमांडोही शहरात दाखल
वृत्तसंस्था/ लॉस एंजिलिस
अमेरिकेतील प्रांत कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजिलिसमध्ये 4 दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात अवैध स्थलांतरितांवर होत असलेल्या कारवाईच्या विरोधात हिंसक निदर्शने होत आहेत. या निदर्शनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने आणखी 2 हजार नॅशनल गार्ड्स तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे तैनात होणाऱ्या नॅशनल गार्ड्सची एकूण संख्या 4 हजार होणार आहे. याचबरोबर 700 मरीन कमांडो देखील तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मरीन कमांडो हे नॅशनल गार्डसोबत मिळून सुरक्षा व्यवस्था सांभाळणार आहेत. हे मरीन कमांडो दक्षिण कॅलिफोर्नियाच्या ट्वेंटी नाइन पाम्स तळावरून दाखल होणार आहेत. यापूर्वी ट्रम्प यांनी लॉस एंजिलिसमध्ये होत असलेली हिंसा आणि तोडफोडीनंतर तैनात करण्यात आलेल्या नॅशनल गार्ड्सचे कौतुक केले होते. हे जवान सर्वसाधारणपणे प्रांताच्या गव्हर्नरांच्या आदेशावर बोलाविले जातात, परंतु यावेळी ट्रम्प यांनी स्वत:च या जवानांना तैनात करण्याचा आदेश दिला आहे.
कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसम यांना अटक केल्यास ते चांगले पाऊल ठरेल. गेविन लॉस एंजिलिसमध्ये नॅशनल गार्ड्सना तैनात करण्यास विरोध करत आहेत. न्यूसम यांनी अत्यंत खराब काम केले आहे. पुन्हा गव्हर्नर होण्याकरता ते हिंसेला मुभा देत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. जर एखाद्या शासकीय अधिकाऱ्याने संघीय कायद्याच्या अंमलबजावणीत अडथळे आणल्यास त्याला अटक केली जाऊ शकते असे ट्रम्प यांचे सहकारी आणि बॉर्डर अधिकारी टॉम होमन यांनी म्हटले आहे.
अमेरिकन ध्वजाचा अवमान
निदर्शनांदरम्यान समाजकंटकांनी शेकडो वाहने पेटवून दिली आहेत. अनेक निदर्शक अमेरिकन ध्वजावर थुंकताना दिसून आले. जे लोक निदर्शनांदरम्यान मास्क वापरत आहेत, त्यांना त्वरित अटक करण्यात यावे असा आदेश ट्रम्प यांनी दिला आहे. तर निदर्शक सुरक्षा कॅमेऱ्यांपासून वाचण्यासाठी मास्क वापरत आहेत. लॉस एंजिलिस शहरावर अवैध स्थलांतरितांचा कब्जा असून तो लवकरच दूर केला जाणार असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
निदर्शकांना चीनकडून वित्तसहाय्य
ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीने लॉस एंजिलिसमधील निदर्शनांवरून डेमोक्रेट नेते आणि चीनवर गंभीर आरोप केले. या निदर्शनांना डेमोक्रेटचे समर्थनप्राप्त संघटना आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित संस्थांकडून वित्तपुरवठा केला जात असल्याचा आरोप रिपब्लिकन खासदार बिल एसेयली यांनी केला.