रशिया-जपानदरम्यान तणाव
रशियन लढाऊ विमानांकडून घुसखोरी
वृत्तसंस्था/ टोकियो
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियाच्या लढाऊ विमानांनी तीनवेळा जपानमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी रात्री रशियन लढाऊ विमानांनी तीनवेळा आमच्या हवाईहद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप जपानकडून करण्यात आला आहे.
रशियन लढाऊ विमानांनी होक्काइडोच्या मुख्य बेटावर घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. यादरम्यान जपानी लढाऊ विमानांनी रशियाच्या विमानांना इशारा देत पहिल्यांदाच फ्लेयर्सचा वापर केला आहे. रशियन आयएल-39 सैन्य गस्त विमानाने सोमवारी होक्काइडोनजीक तीनवेळा जपानी हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले. यावर जपानने रशियाच्या विमानांना रेडिओ संदेशांच्या माध्यमातून इशारा दिला. तर तिसऱ्यांदा जपानी हवाई क्षेत्रात आलेल्या रशियन विमानाच्या विरोधात जपानी विमानाने फ्लेयर्सचा वापर केला आहे. हवाई घुसखोरीच्या विरोधात फ्लेयर्सचा हा पहिलाच वापर होता अशी माहिती जपान सरकारचे प्रवक्ते योशिमासा हयाशी यांनी दिली आहे.
रशिया-चीनचा युद्धाभ्यास
या घुसखोरीच्या विरोधात जपानने राजनयिक पाऊलही उचलले आहे. सध्या रशियाकडून या घुसखोरीप्रकरणी कुठलीच टिप्पणी करण्यात आलेली नाही. ही घटनारशिया आणि चीनच्या युद्धनौका जपानच्या उत्तर किनाऱ्यानजीक युद्धाभ्यास करत असताना घडली आहे. दुसरीकडे जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सोमवारीच युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली आहे.
दीर्घकाळापासून वाद
रशिया आणि जपान यांच्यात होक्काइडोनजीकच्या बेटांवरून दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. या बेटांना दुसऱ्या महायुद्धादरम्यान रशियाने जपानकडून ताब्यात घेतले होते. अशास्थितीत रशियन विमान कधीकधी जपानी हवाईक्षेत्रात दाखल होत असतात. याच्या विरोधात जपानने या भागात लढाऊ विमाने तैनात केली आहेत. मागील महिन्यात देखील एका रशियन विमानाने जपानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले होते.