For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताच्या 2 मित्र देशांमध्ये तणाव

06:41 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताच्या 2 मित्र देशांमध्ये तणाव
Advertisement

मिराज जेटबंदीनंतर फ्रान्सकडून इस्रायलला आणखी एक झटका

Advertisement

इस्रायलने फ्रान्ससोबत सर्व संरक्षण संबंध रोखण्याची घोषणा केली आहे. इराण युद्धादरम्यान फ्रान्स शत्रुत्वपूर्ण भूमिका बाळगत असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. फ्रान्स कधीकाळी इस्रायलचा मजबूत संरक्षण भागीदार होता आणि त्याने इस्रायलला लढाऊ विमानांचाही पुरवठा केला होता. परंतु आता दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कटुता आली आहे.

इस्रायल संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक मेजर जनरल अमीर बाराम यांनी फ्रान्ससोबतचे संरक्षण संबंध रोखण्याची घोषणा केली. यानुसार फ्रान्सकडून होणारी सर्व संरक्षण खरेदी घटवून शून्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच्या जागी आता सर्व देशांतर्गत इस्रायली खरेदी किंवा सहकारी देशांकडून संरक्षण खरेदी करण्यात येणार आहे. फ्रान्सने इस्रायलची सुरक्षा आणि आमच्या संरक्षण उद्योगाच्या संचालनात्मक क्षमतेला नुकसान पोहोचविणारी अनेक पावले उचलली असल्याचा दावा अमीर बाराम यांनी केला.

Advertisement

फ्रान्स अन् इस्रायलदरम्यान तणाव

इराणसोबत आम्ही युद्ध लढत असताना फ्रान्सने आमच्यासोबतचे सुरक्षा सहकार्य कमी केले आहे. फ्रान्सने अलिकडच्या काळात इस्रायलच्या विरोधात अनेक पावले उचलली असल्याचा आरोप बाराम यांनी केला.

-फ्रान्सने इस्रायलवर शस्त्रास्त्र बंदी लादण्याच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आवाहनांचे समर्थन केले आहे.

-सप्टेंबर 2025मध्ये फ्रान्सने इस्रायल विरोधात जात पॅलेस्टाइनला देश म्हणून मान्यता दिली होती.

-पॅरिसमध्ये आयोजित संरक्षण प्रदर्शनांमध्ये इस्रायली कंपन्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती.

-फ्रान्सने अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांना नेणाऱ्या इस्रायलच्या विमानांना स्वत:च्या हवाईक्षेत्रातून जाण्यास मज्जाव केला.

शस्त्रास्त्रबाजारात फ्रान्स अन् इस्रायली प्रतिस्पर्धी

फ्रान्स आणि इस्रायल जागतिक शस्त्रास्त्र निर्यात बाजारात परस्परांचे प्रतिस्पर्धी आहेत. फ्रान्स जगातील दुसऱ्या क्रमांकाचा शस्त्रास्त्र निर्यातदार आहे, तर इस्रायल याप्रकरणी आठव्या स्थानावर आहे. हे दोन्ही देश अनेकदा शस्त्रास्त्र आयात करण्णाऱ्या प्रमुख देशांच्या बाजारात स्वत:च्या हिस्सेदारीसाठी परस्परांशी चढाओढ करत असतात.

एकेकाळी घनिष्ठ संबंध

-1948 मध्ये इस्रायलच्या जन्मानंतर दोन दशकांपर्यंत फ्रान्स त्याचा सर्वात मजबूत आणि सर्वात विश्वासार्ह संरक्षण भागीदार होता.

-अत्याधुनिक लढाऊ विमान, रणगाडाविक्री अन् आण्विक तंत्रज्ञानातही मदत करण्यास फ्रान्स एकमात्र पाश्चिमात्य शक्ती तयार होती.

-इस्रायलवर अमेरिकेचे कठोर निर्बंध असताना फ्रान्सनेच संरक्षण तंत्रज्ञान पुरवत  त्याच्या सुरक्षेकरता मोठे योगदान दिले होते.

-अमेरिकेने 1950 च्या त्रिपक्षीय घोषणेच्या अंतर्गत इस्रायलला शस्त्रास्त्रांच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

-1949 च्या अरब-इस्रायल युद्धविरामादरम्यान निर्धारित सीमांची हमी देणारी त्रिपक्षीय घोषणा अमेरिका, ब्रिटन अन् फ्रान्सने केली होती.

-1953 सालापर्यंत फ्रान्सने गुपचूपणे इस्रायलला पुन्हा शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू केला. दोन्ही देशांचे संरक्षण संबंध पुन्हा प्रस्थापित झाले.

-फ्रान्सने इस्रायलला स्वत:चे पहिले लढाऊ विमान विकले, ज्याचे नाव डसॉल्ट ऑरागन होते, नंतर फ्रान्सने मिस्टेयर सीरिजची लढाऊ विमाने दिली.

-1956 च्या सुएज कालवा संकटादरम्यान इस्रायल, ब्रिटन अन् फ्रान्स एका बाजूने लढले, तर अमेरिकेने इजिप्तवर सैन्यहल्ल्याला विरोध केला होता.

-1959 मध्ये फ्रान्सने इस्रायलला स्व्त:चे अत्याधुनिक डसॉल्ट मिराज तीन विकले होते, हे विमान इस्रायलच्या वायुदलाचा कणा ठरले होते.

-इस्रायलकडे 70 हून अधिक मिराज लढाऊ विमाने होती, ज्यांचा वापर 1967 च्या अरब देशांच्या विरोधातील युद्धात करण्यात आला होता.

-फ्रान्सने इस्रायलला एएमएक्स-13 हलके रणगाडे, तोफा, रडार सिस्टीम अणि युद्धनौकांचाही पुरवठा यापूर्वी केला आहे.

1967 च्या युद्धात मोडला विश्वास

1967 च्या 6 दिवसीय युद्धादरम्यान इस्रायलला फ्रान्सची सर्वाधिक आवश्यकता असताना फ्रेंच अध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अचानक स्वत:चे धोरण बदलले आणि इस्रायलला होणाऱ्या शस्त्रास्त्रपुरवठ्यावर बंदी घातली होती. इस्रायलने पूर्वीच पेमेंट केलेल्या 50 मिराज-5 जेट विमानांचा पुरवठा करण्यासही फ्रान्सने नकार दिला होता. ही लढाऊ विमाने इस्रायलच्या खास आवश्यकतांनुसार निर्माण करण्यात आली होती आणि त्यावेळी इस्रायलने फ्रान्सला 75 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक पेमेंट केले होते. तरीही फ्रान्सने लढाऊ विमाने पुरविण्यास नकार दिला होता. 1972 मध्ये फ्रान्सने इस्रायलला ही रक्कम व्याजासह परत केली, परंतु फ्रान्सने इस्रायलच्या वायुदलाच्या आधुनिकीकरणाच्या योजनेला मोठा धक्का पोहोचविला होता. या प्रकारानंतर इस्रायलने स्वत:च शस्त्रास्त्र निर्मिती सुरू केली आणि आता तो अत्याधुनिक शस्त्रास्त्र निर्मितीत फ्रान्सच्या बरोबरीला आहे.

Advertisement
Tags :

.