भीलवाडानंतर हनुमानगड येथे तणाव
हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱयाला मारहाण : राजस्थानात तणावाचे सत्र
वृत्तसंस्था /हनुमानगड
राजस्थानात सांप्रदायिक तणाव कमी होण्याची चिन्हे नाहीत. भीलवाडानंतर आता हनुमानगड जिल्हय़ातील नोहर येथे बुधवारी रात्री उशिरा दोन समुदायांदरम्यान वाद झाला. या वादादरम्यान एका समुदायाच्या लोकांनी विहिंप नेत्यावर जीवघेणा हल्ला केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी तातडीने पावले उचलून संबंधित भागात पुढील आदेशापर्यंत इंटरनेट सेवा बंद करून काही जणांना ताब्यात घेतले आहे.
सलग तिसऱया दिवशी राजस्थानात सांप्रदायिक हिंसा फैलावली आहे. प्रथम भरतपूर, मग भीलवाडा आणि आता हनुमानगड जिल्हय़ात हिंसा झाली आहे. विहिंप नेते सतवीर सहारण जखमी झाल्याचे कळताच हिंदुत्ववादी संघटनांनी रस्त्यावरील वाहतूक रोखून धरून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. तर रात्री उशिरा पोलिसांनी लाठीमार करत रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत केली. पोलीस अधीक्षक अजय सिंह यांच्यानुसार सांप्रदायिक सौहार्द बिघडविल्याच्या आरोपाप्रकरणी 35 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नोहर येथील मंदिरात बुधवारी पूजा करण्यासाठी महिला, युवती आणि पुरुष आले होते. यादमान काही जणांनी महिला आणि युवतींची छेड काढण्यास सुरुवात sकली. यावरून रात्री दोन समुदायांदरम्यान वाद झाला. छेडछाडीला विरोध करणाऱया विहिंप नेत्यावर काठय़ांनी वार करण्यात आले.
या घटनेनंतर खबरदारीदाखल मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱयांच्या विरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.