श्री खाप्रेश्वर मंदिर हटविण्यावरुन तणाव
भाविकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी : मंदिर पाडताना पाहून अनेकांना अश्रू अनावर
पणजी : पर्वरी येथील उड्डाणपुलाचे काम चालू असलेल्या मुख्य राष्ट्रीय महामार्गाशेजारी असलेल्या श्री खाप्रेश्वराच्या मंदिराचे पत्र्याचे बांधकाम रस्ता कामासाठी जमिनदोस्त करण्यात आले. तेव्हा जमलेल्या भाविकांचे डोळे पाणावले. त्यांचा कंठही दाटून आला. काहींना तर अश्रूही अनावर झाले. हा प्रकार म्हणजे ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ असल्याचा आरोप भाविकांनी केला आणि याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला.
श्री खाप्रेश्वराची मूर्ती हलवण्यास आणि तिला हात घालण्यास उपस्थित भाविकांनी जोरदार विरोध दर्शवून आक्षेप घेतला. ‘खाप्रेश्वर महाराज की जय? अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी जमलेल्या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान, मंदिराचे बांधकाम पाडल्यानंतर पुढील कारवाई थांबवण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरुन संबंधित पोलिसांना देण्यात आले.
काल रविवारी सकाळपासून खाप्रेश्वर मंदिराच्या बाजूला आणि मुख्य रस्त्याशेजारी असलेला वटवृक्ष हलवण्याचे काम सुरु झाले तेव्हापासून पुढे काय होणार? म्हणून तेथे हळूहळू लोक, भाविक जमू लागले. झाड हटवण्यास सहसा कोणी विरोध केला नाही. सकाळपासूनच मोठा फौजफाटा लावण्यात आला होता. वडाच्या झाडाकडे, मंदिराकडे जाण्यास पोलिसांनी प्रतिबंध केला होता. तरीही दुपारपर्यंत बरेच लोक तेथे जमले.
भाविकांनी मंदिर तोडण्यास घेतला आक्षेप
सुरुवातीला वडाचे झाड हटवणार असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते आणि ते दुसरीकडे वसवणार अशी माहिती देण्यात येत होती. नंतर हळूहळू कंत्राटदार, कामगार पोकलिन घेऊन पुढे सरसावले आणि ते मंदिराच्या पत्र्याच्या बांधकामाकडे पोहोचले तेव्हा भाविकांना मंदिराचे बांधकाम पाडणार असा संशय आला आणि तो खरा ठरला. मंदिरातील मूर्ती काढण्यासाठी भाड्याने पुजारी आणण्यात आले, असा आरोप भाविकांनी केला आणि मूर्ती काढण्यास जोरदार आक्षेप घेतला.
पुजाऱ्यांना रोखण्यासाठी भाविकांनी साद घातली आणि मूर्तीला हात लावू नका म्हणून मागणी केली. तसेच पुजाऱ्यांनी माघारी फिरावे. या कृत्यात सहभागी होऊ नये, त्याचे परिणाम वाईट होतील असा इशाराही भाविकांनी दिला. कडक पोलिस बंदोबस्तामुळे भाविक मंदिरापर्यंत जाऊ शकत नव्हते म्हणून ते बाजूला राहूनच मंदिराचे बांधकाम पाडण्याच्या कृतीचा निषेध करत होते. शेवटी त्यांच्या डोळ्dयासमोरच बांधकाम पाडण्यात आले. हा सर्व प्रकार चालू असताना अचानक पुढील कारवाई थांबवण्यात आली. कारवाई स्थगित करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या प्रकाराचा तेथील तेथील जाणत्या भाविकांनी निषेध नोंदवला. श्री देव खाप्रेश्वर त्यांना कधीच क्षमा करणार नाही, असेही भाविकांनी नमूद केले.
त्याठिकाणी नव्याने मंदिर उभारणार : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील श्री देव खाप्रेश्वर मंदिर प्रकरणाची दखल घेऊन त्यात हस्तक्षेप केला. तेथील वटवृक्ष ज्या ठिकाणी स्थलांतरित करुन पुन्हा वसवण्यात येईल त्या ठिकाणी सरकारतर्फे श्री देव खाप्रेश्वर मंदिराची नव्याने उभारणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खाप्रेश्वर मंदिर प्रकरणातून निर्माण झालेल्या वादावर व लोक प्रक्षोभावर पडदा टाकण्यासाठी डॉ. सावंत यांनी ही उपायोजना केली आहे.