कबनूरमध्ये महावितरणच्या कामावरुन तणाव
जमिनीखालून केबल टाकण्याचे काम निकृष्ट असल्याची कोले यांची तक्रार
आमदार आवाडेंकडून तक्रार निराधार असल्याचे सांगत काम करण्यास मंजूरी
कोलेकडून आत्मदहनाचा प्रयत्न, चर्चेअंती माघार
कोल्हापूरः (कबनूर)
वाहतुकीला अडथळा करणारे इतर खांब ट्रान्स्फॉर्मर व विद्युत तारा काढून जमिनीखालून केबल टाकण्याचे काम सुरू होते. परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून ते काम थांबवले होते. दरम्यान, आमदार राहुल आवाडे यांनी विद्युत वितरण कंपनीस काम सुरू करण्यास सांगितले. यावरुन तक्रारदार सागर कोले यांनी तक्रार ऐकून घेतली नसल्याने सांगत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. नंतर आवाडेंनी पुन्हा चर्चा केली. कोले यांनी माघार घेत कामात अडथळा न करता कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत रीतसर लढा चालूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.
कबनूर (ता. हातकणंगले) येथील देशभक्त रत्नप्पाण्णा कुंभार चौकातील वाहतुकीस अडथळा करणारे विद्युतखांब, ट्रान्स्फार्मर व विद्युततारा काढून जमिनी खालून केबल टाकण्याचे काम सुरू होते. हे काम विद्युत वितरण कंपनीकडून सुरू होते. हे काम निकृष्ट दर्जाचे आहे, असा आरोप करून तक्रारदार सागर कोले यांच्याकडून काम थांबवले होते. दरम्यान, आमदार राहुल आवाडे यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन तक्रारदारांचा विरोध डावलून विद्युत वितरण कंपनीस काम सुरू करण्यास सांगितले.
या चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी चौकात भूमिगत केबल टाकणे व इतर कामांसाठी ८० लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. गुरुवार २७ मार्च रोजी होणाऱ्या ऊरुसापूर्वी हे काम व्हावे. म्हणून महावितरण कंपनीने जमिनीखालून केबल टाकण्याचे काम सुरू केले होते. मात्र या निकृष्ट कामाची चौकशी करावी व चौकशीची मागणी करत काम थांबवण्यात आले होते.
दरम्यान, शनिवारी दुपारी या कामाची पाहणी करण्यासाठी आमदार आवाडे आले असल्याची माहिती कार्यकर्ते कोले यांना मिळाली. आमदारांनी तत्काळ महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना काम सुरू करण्यास सांगितले. या ठिकाणी तक्रारदार सागर कोले यांनी आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न केला असता आमदार राहुल आवाडे तक्रारदाराला म्हणाले की, कामाला निकृष्ट म्हणायला तुमचे क्वॉलिफिकेशन आहे का? तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का? अशी विचारणा करून आमदार आवाडे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना काम तत्काळ सुरू करण्यास सांगितले.
आपली तक्रार ऐकूनच घेतली नसल्याच्या कारणावरून संतप्त झालेले तक्रारदार सागर कोले हे आत्मदहनासाठी पेट्रोल आणण्यासाठी निघून गेले. त्यामुळे चौकात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. काही युवकांनी सागर कोले यांना आत्मदहनापासून परावृत करून आमदार आवाडे यांच्याशी चर्चा घडवून आणली. आमदार आवाडे यांनी तक्रारदार कोले यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तक्रारदार कोले यांनी मी कामात अडथळा करणार नाही. पण, कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत रीतसर लढा चालूच ठेवणार असे स्पष्ट केले.