परप्रांतीयाच्या कृत्यानंतर गडहिंग्लजमध्ये तणाव
कोल्हापूर :
शहरासह परिसरात पीओपीचे काम करणाऱ्या परप्रांतीयाकडे कामास असणाऱ्या एका परप्रांतीय कामगाराने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या चर्चेनंतर संतप्त जमावाने काजुबाग परिसरात असणारे परप्रांतीयाचे दुकान फोडले. त्यानंतर जमावाने पोलीस ठाण्यावर धाव घेत संबंधीत दोघा परप्रांतीयावर गुन्हा दाखल करावा अशी जोरकस मागणी केली. यावेळी घोषणाबाजी झाल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलीस निरीक्षक सतिश होडगर यांनी संबंधीतांच्यावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळले. या प्रकरणी संशयीत शहजाद शेख (रा. शंभ्रपूर, उत्तरप्रदेश) आणि त्याचा मालक बरकतअली रईस पाशा (रा. गडहिंग्लज) दोघांवर गडहिंग्लज पोलीसात वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील काजूबाग येथे बरकतअली पाशा याचे पीओपी विक्रीचे दुकान आहे. गेल्या 20 वर्षापासून बकरतअली हा गडहिंग्लजसह भागात इमारतीच्या पीओपीचे काम घेतो. त्याच्याकडे काम करणाऱ्या शहजाद शेख या तरूणाने 8 दिवसापुर्वी घरात कोणी नसल्याचे पाहून काजूबाग परिसरात राहणारी अल्पवयीन शाळकरी मुलगी भांडी धुवून घरात येताना तिचा मोबाईलवर फोटो काढला. त्यानंतर फोटो डिलीट करण्याची मागणी या मुलींने केली. याकडे दुर्लक्ष करत शहजाद याने तिचा हात धरून विनयभंग केला. हा प्रकार आज दुपारी सदर मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितला.
तत्पुर्वीच शहजाद याला बकरतअली पाशा याने मारून गावी पाठवून दिले. या प्रकाराची गुरूवारी दिवसभर शहरातील विविध व्हॉटसअप ग्रुपवर चर्चा होत असताना बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर संतप्त जमावाने सायंकाळी 5 वाजता एकत्र येत काजूबागेतील मुख्य मार्गावरील बरकतअलीचे पीओपीचे दुकान फोडले. मोठा जमाव एकाच ठिकाणी आल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला. मोठी गर्दी झाल्याने वेळेवर पोलीसांनी तातडीने पावले उचलत बंदोबस्त वाढवला. तर बरकतअली हा पोलीसात हजर झाला. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, आप्पा शिवणे, संतोष चिक्कोडे, सागर मांजरे, राहूल शिंदे, मनोज पवार, संदीप कुराडे, प्रितम कापसे, गोपी करनूली, अशोक शिंदे, सुरेश हेब्बाळे, संदीप पाटील, मनोज गाताडे, तुषार रणदिवे, संदीप कुरबेट्टी यांच्यासह शहरातील तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हळूहळू सायंकाळी 6 च्या दरम्यान पोलीस ठाण्यासमोर पिडीत मुलीच्या नातेवाईकांसह शहरातील तरूणांनी मोठी गर्दी केली. संबंधीत दोघांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. पोलीस ठाण्याच्या परिसरात संतप्त जमावाने जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी पोलीस निरीक्षक सतिश होडगर जमावासमोर येत सदर दोघांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. तरीही जमाव या परिसरात ठाण मांडून होता. यावेळी ज्यादाचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अखेर शहजाद शेख आणि बकरतअली पाशा या दोघा संशयीतांवर पोस्को आणि विनयभंग असे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांनी दिली. यावेळी पोनि होडगर उपस्थित होते. पिडीत मुलीच्या वडीलानी याची फिर्याद दिली आहे. बरकतअली पाशा याला पोलीसांनी ताब्यात घेतले असून शहजाद शेख याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात आले. गुन्हा नोंदवल्याची माहिती दिल्यानंतर रात्री 8 च्या सुमारास वातावरण निवळले.
दुकानाची तोडफोड
गडहिंग्लज शहरासह परिसरात 20 वर्षाहून अधिक कालावधीत बरकतअली पाशा हा पीओपीचे काम करतो. त्याने काजूबागेत मुख्य मार्गावर गाळा भाड्याने घेवून दुकान घातले आहे. संतप्त जमावाने या दुकानावर लक्ष केंद्रीत करत तोडफोड केली. दुकानातील फुटक्या काचेचा खच बाहेर पडला होता. दुकानाच्या शेजारचे गोडाऊनच्या दाराची तोडफोड सुरू होती. तेवढ्यात पोलीस दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. या दुकान फोडीनंतर परिसरातील नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली.
परप्रांतीयाची चौकशी करा
गडहिंग्लज शहरात सद्या परप्रांतीयांची संख्या वाढली आहे. त्यांच्यातील काहांकडून असे प्रकार वारंवार घडत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे याचा स्थानिकांत प्रचंड संताप आहे. आजच्या प्रकारानंतर हा संताप उसळून आला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले शहरात असणाऱ्या संपूर्ण परप्रांतीयांची पोलीसांनी नोंदणी करून माहिती द्यावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.