Karad News | शेतकरी पाणी देत असतानाच अचानक सुटली गोळी! धोंडेवाडीतील 'त्या' दुपारी नेमकं काय घडलं?
कराड तालुक्यात शेतात बंदुकीचा धाक
कराड -धोंडेवाडी (ता. कराड) येथे शेतातील किरकोळ कारणावरून वाद वाढत जाऊन छयाची बंदूक चालवून शेतकऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी धनाजी पोपट पाटील (वय ३६, रा. धोंडेवाडी) यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना शस्त्रासह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धनाजी पाटील यांच्या शेतीपंपाच्या मोटारीची वायर तोडली होती.
ही वायरजोडत असताना जगन्नाथ रामचंद्र पाटील यांनी वायर जोडलीस तर जीवे मारीन, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. वडील घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी मोटारीची वायर पुन्हा जोडली. दरम्यान, धनाजी पाटील हे दुपारच्या सुमारास शेतात पाणी देत असताना जगन्नाथ पाटील हे बंदूक घेऊन तेथे आले. त्यांनी काही अंतरावर गोळीबार करून दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. काही वेळानंतर पुन्हा जगन्नाथ पाटील यांनी धनाजी पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली.