दोन गटातील संघर्षानंतर छत्तीसगडमध्ये तणाव
दगडफेकीत 5 जण गंभीर जखमी; 300 पोलीस तैनात
वृत्तसंस्था/ विलासपूर
छत्तीसगडच्या विलासपूर शहरात शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर तणाव निर्माण झाला. ही घटना नगर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरगंज परिसरात घडली. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वैमनस्यावरून दोन लोकांमध्ये वाद झाला होता. या घटनेदरम्यान, एका व्यक्तीने दुसऱ्यावर दगडाने हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर जखमी व्यक्तीने आपल्या मित्रांना बोलावल्याने दोन्ही बाजूंमध्ये दगडफेक सुरू झाली. या घटनेत दोन्ही गटांमधील तिघांसस दोन पोलीसही गंभीर जखमी झाले. तणाव वाढल्याने अतिरिक्त पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणाचा तपास सुरू असून दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. पोलिसांनी परिसरात सुरक्षा वाढवली असून 300 पोलिसांद्वारे वारंवार गस्त सुरू आहे. तणाव वाढू नये यासाठी प्रशासनाने जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.