Sangli Politics : महेश पाटील यांच्या‘यु-टर्न”चर्चेवेळी तणाव
ईश्वरपूर निवडणुकीत राजकीय तणाव
ईश्वरपूर : उरुण-ईश्वरपूर नगरपालिका निवडणूक पहिल्या टप्यापासूनच तणावाच्या वळणावर चालली असून सोमवारी भाजपाचे पदाधिकारी व स्व. अशोकदादा पाटील यांचे पुत्र महेश पाटील व विजय कुंभार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस श.प. पक्षात प्रवेश केला. दरम्यान गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील हे त्यांची 'युटर्न'साठी मनधरणी करीत असतानाच आ. जयंत पाटील समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या कार्यालयासमोर जमल्याने काहीसा तणाव निर्माण झाला.
अनेक वर्षापासून भाजपात असणारे पाटील व कुंभार है सोमवारी आ.जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले. दरम्यान महेश पाटील यांनी नगरपालिकेत गुंडांच्या टोळ्या येत आहेत. हे खपवून घेतले जाणार नाहीत, अशी जहरी टीका केली होती. या घटनेला चार दिवस होत असतानाच महेश पाटील यांचे चुलत बंधू निशिकांत भोसले-पाटील, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, अजित पाटील, वैभव पवार यांनी महेश पाटील यांच्यासह त्यांचे बंधू भाजपाचे नेते विक्रम पाटील, कुंभार यांची मनधरणी करून पुन्हा महायुतीत आणण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्याशी गुप्त ठिकाणी बसून चर्चा करून हे सर्वजण भोसले-पाटील यांच्या गाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या कार्यालयात आले. दरम्यान पत्रकारांनाही बोलावून घेतले. पण कार्यालयात आल्यानंतर ही त्यांच्यातील गुप्त चर्चा सुरुच होती. बंद खोलीत ही चर्चा सुरु असताना, आ. पाटील गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे, शहराध्यक्ष शहाजी पाटील, खंडेराव जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या कार्यालयसमोर जमा झाले.
तेकाही काळ कार्यालयासमोर थांबून राहिले. दरम्यान निशिकांतदादा गटाकडून ही कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरु झाली. त्यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला. काही वेळ बाहेरील आवारात व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाजवळ थांबून आ. पाटील समर्थक आपल्या पक्षाच्या कार्यालयाकडे निघून गेले. या घडामोडी सुरु असतानाच भोसले-पाटील हे एकटे आपल्या गाडीतून बाहेर पडले. दरम्यान याबाबतची माहिती पोलीसांना मिळताच पोलीस कुमक ही दाखल झाली. रात्री उशिरापर्यंत महेश पाटील व विक्रम पाटील यांच्याशी चर्चा सुरु होती.