कुंकळळी दोन गटांमध्ये तणाव
एकमेकांच्या विरोधात पोलिस तक्रारी : अतिरिक्त पोलिस बंदोबस्त
मडगाव : कुंकळळीत जुलूस काढण्यावरून तणाव निर्माण झाला होता. त्याचे पडसाद उमटू लागले असून काल दोन गटांमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला दोन्ही गट कुंकळळी पोलिसस्थानकात दाखल झाले. बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याने आपल्याला मारहाण केल्याची तक्रार एका मुस्लिम व्यक्तीने केली आणि त्याच्या अटकेची मागणी केली. कुंकळळी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या तक्रारी नोंद करून घेतल्या आहेत. बजरंग दलाने कुंकळळीत जुलूस काढण्यास तीव्र विरोध दर्शविला होता. त्यांनी पोलिसांना निवेदन सादर केले होते. दुसऱ्या बाजूने मुस्लिम बांधवांनी जुलूस काढला होता. तेव्हापासून या ठिकाणी तणावाची परिस्थिती होती. त्यात कुंकळळीच्या एका मुस्लिम व्यक्तीला मारहाणीचा प्रकार घडला. मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक करावी, या मागणीसाठी काल रविवारी सुमारे 200 मुस्लिम कुंकळळी पोलिसस्थानकात एकत्र आले.
देवीबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप
दरम्यान, मुस्लिम व्यक्तीने आपल्या देवीबद्दल अपशब्द काढल्याने, समस्त भाविकांच्या भावना दु:खावल्या, देवीबद्दल अपशब्द काढणाऱ्या मुस्लिम व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी हिंदू बांधवांनी यावेळी केली. हिंदू बांधवही मोठ्या संख्येने पोलिस स्थानकावर जमा झाले होते. कुंकळळी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या तक्रारी नोंद करून घेतल्या असून या प्रकरणाची चौकशी केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी यावेळी स्पष्ट केले. परिस्थिती चिघळू नये यासाठी कुंकळळी पोलिस स्थानकावर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री उशिरा दोन्ही गट मागारी फिरले.