व्हेनेझुएलामध्ये तणाव अन् दहशत
मादुरोंच्या सुटकेसाठी अमेरिकेवर दबाव : चीनसह विविध देशांकडून मागणी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन, कराकस
अमेरिकेच्या हल्ल्यात राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक झाल्यानंतर व्हेनेझुएला गंभीर संकटात सापडले आहे. स्फोट, वीजपुरवठा खंडित होणे आणि सशस्त्र गस्त यामुळे कराकसमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकार समर्थक आणि विरोधक यांच्यात एकवाक्यता नसल्यामुळे देशाच्या भविष्याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातच आता अमेरिकेच्या तात्पुरत्या नियंत्रणाच्या दाव्यामुळे देशात नाराजी आहे. दुसरीकडे, मादुरो यांची तत्काळ सुटका करण्यात यावी अशी मागणी करत चीनसह बऱ्याच देशांनी अमेरिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न चालवला आहे.
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी जागतिक पातळीवरून केली जात आहे. दोघेही सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहेत. अमेरिकन सैन्याने निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना ताब्यात घेऊन न्यूयॉर्कला नेले आहे. कराकसमधून याची अधिकृतपणे त्वरित पुष्टी झाली नसली तरी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओंमुळे याबाबत सत्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर आता अमेरिकेचा ताबा राहील असे स्पष्ट करत त्यांच्या तेल पायाभूत सुविधांचे रक्षण करेल, असेही जाहीर केले आहे. परंतु ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे व्हेनेझुएलामध्ये प्रचंड नापसंती असल्याचे चित्र दिसत आहे.
व्हेनेझुएलाच्या तेलसाठ्यांवर आता अमेरिकेचे नियंत्रण
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी शनिवारी सकाळी व्हेनेझुएलावर हवाई हल्ला केल्यानंतर अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला पकडून अमेरिकेला नेले आहे. या लष्करी कारवाईनंतर ट्रम्प यांनी अमेरिका सध्या व्हेनेझुएलाचे प्रशासन सांभाळेल असेही जाहीर केले आहे. अमेरिकन तेल कंपन्या देशाच्या खराब झालेल्या तेल उद्योगाला पुनरुज्जीवित करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करतील. यामुळे व्हेनेझुएला जगाला तेल पुरवठा करणारा एक प्रमुख देश बनू शकेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. यूएस एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन नुसार, व्हेनेझुएलाकडे 303 अब्ज बॅरल कच्च्या तेलाचा प्रचंड साठा असून तो जगातील एकूण तेलाच्या जवळपास एक पंचमांश आहे. हा कच्च्या तेलाचा साठा देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
अमेरिकन तेल कंपन्या व्हेनेझुएलाला जाणार
ट्रम्प यांनी ‘आम्ही आमच्या खूप मोठ्या अमेरिकन तेल कंपन्यांना व्हेनेझुएलाला पाठवू. या तेल कंपन्या गंभीरपणे खराब झालेल्या तेल पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करतील आणि अमेरिका सध्या व्हेनेझुएलाच्या सरकारचे प्रशासन करेल.’ असे मार-ए-लागो येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
चीनच्या परराष्ट्र विभागाकडून निवेदन जारी
अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीची तात्काळ सुटका करावी अशी मागणी चीनने केली आहे. दोघेही सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहेत. अमेरिकन सैन्याने त्यांना व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथून ताब्यात घेत अमेरिकेला नेले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी एक निवेदन जारी केले. अशाप्रकारे राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या देशात घेऊन जाणे चुकीचे आहे आणि हा प्रश्न संवादाद्वारे सोडवला पाहिजे, असे चीनने म्हटले आहे. चीनने यापूर्वी अमेरिकेच्या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
मादुरोंच्या अटकेवर ममदानी यांचा संताप
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेवर न्यूयॉर्क शहराचे नवनियुक्त महापौर जोहरान मामदानी यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी याला ‘युद्धाची कृती’ असे संबोधत हे पाऊल आंतरराष्ट्रीय आणि अमेरिकन कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. उत्तर कोरियाने रविवारी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अपहरणाचा निषेध केला. उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने याला व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्वावर गंभीर हल्ला असे म्हणत ही घटना अमेरिकेच्या बळाचा वापर दर्शवते, असे स्पष्ट केले.