For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

हनुमानध्वज उतरविल्याने तणाव

06:34 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
हनुमानध्वज उतरविल्याने तणाव

मंड्या जिल्ह्यातील केरगोडू येथील घटना : पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

मंड्या जिल्ह्यातील केरगोडू येथे हिंदुत्ववादी संघटनांनी लावलेला हनुमानध्वज उतरविल्याच्या मुद्द्यावरून गावात तणाव निर्माण झाला. यावेळी प्रक्षुब्ध झालेल्या जमावावर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेच्या निषेधार्थ मंड्या, गदग, शिमोगा, बेंगळूरसह विविध ठिकाणी भाजप, निजद नेत्यांसह विविध संघटनांनी निदर्शने केली. दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांनी 9 फेब्रुवारी रोजी ‘मंड्या बंद’ची हाक दिली आहे. भाजप आणि निजदने बंदला पाठिंबा दिला.

Advertisement

घटनेच्या निषेधार्थ भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी प्रत्येक जिल्ह्यात हनुमानध्वज हाती धरून आंदोलन केले. केरगोडू येथे ग्रामस्थ आणि हिंदू कार्यकर्त्यांनी हनुमानाचा पोस्टर लावून आंदोलन सुरू केले. उतरविण्यात आलेल्या हनुमानध्वजाच्या ठिकाणीच पुन्हा ध्वज फडकविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही जणांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर तुरळक दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे जमावावर पोलिसांनी लाठीमार  केला. या घटनेचे पडसाद राज्यातील विविध ठिकाणी उमटले.

Advertisement

हिंदू कार्यकर्त्यांनी मंड्या शहरातही पदयात्रा काढली. सोमवारी सकाळी कोदंडराम मंदिरापासून 15 कि. मी. अंतरावरील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने पदयात्रा काढला. यात भाजप, निजद नेते सहभागी झाले. निजद नेते माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, भाजप नेते सी. टी. रवी, प्रितम गौडा, केआरआरपी पक्षाचे नेते आमदार जनार्दन रे•ाr सहभागी झाले. बेंगळूरमध्ये म्हैसूर बँक सर्कलमध्ये भाजपने घोषणाबाजी केली. ‘जय श्रीराम, जय हनुमान’चा नारा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी भाजपच्या काही नेत्यांना पोलिसांनी अटक केली.

घटनेची पार्श्वभूमी...

22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडला. याच्या स्मरणार्थ मंड्या जिल्ह्यातील केरगोडू येथील ग्रामस्थ व हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गावात 108 फूट ध्वजस्तंभावर हनुमानध्वज फडकविण्याचा निर्णय घेतला होता. ध्वज फडकविण्याची जागा ग्रामपंचायतीची असल्याने परवानगीसाठी अर्ज करण्यात आला. मात्र,  परवानगी नाकारली. तरी देखील ग्रामस्थांनी हनुमानध्वज फडकविला. याला काहींनी विरोध दर्शविला. अखेर हा मुद्दा पंचायतीत चर्चेला घेतला गेला. त्यावर 22 पैकी 20 सदस्यांनी हनुमानध्वजाला समर्थन दर्शविला. मात्र, सरकारी जागेवर हा ध्वज फडकविण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने तो उतरविण्याचा तोंडी आदेश दिला. त्यानुसार प्रशासनाने 27 जानेवारी रोजी ध्वज उतरविण्याचा प्रयत्न केला. त्यावर ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला. पहाटे 3 वाजता पोलीस बंदोबस्तात ध्वज उतरविण्यात आला.

Advertisement
Tags :
×

.