चारा पुरवठ्यासाठी 10 तालुक्यांच्या निविदा निश्चित
पाच तालुक्यांसाठी पुनर्निविदा मागविणार : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची माहिती
बेळगाव : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आतापासूनच संभाव्य चाराटंचाईची समस्या दूर करण्यासाठी कंबर कसली आहे. चारापुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 15 कोटींची निविदा मागविण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याला 1 कोटीप्रमाणे निधी राखीव ठेवण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. दहा तालुक्यात निविदा निश्चित केली असून उर्वरित पाच तालुक्यांसाठी पुनर्निविदा बोलाविण्यात आली आहे. राज्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य सरकारकडून पाणी व चाऱ्याची तरतूद करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला केली आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेत प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. यंदा पावसाअभावी पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही उद्भवू शकतो. त्यामुळे चारा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेत जिल्हा प्रशासनाकडून चाऱ्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांचे पालनपोषण करणे कठीण झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत चारा उपलब्ध असला तरी भविष्यात चाराटंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे गोशाळा सुरू करण्याची गरज भासू शकते. त्याठिकाणी चारा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 15 तालुक्यांसाठी 1 कोटीप्रमाणे 15 कोटी रुपये निधी चाऱ्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यात अंदाजे 740 टन चारा उपलब्ध करून देण्याच्यादृष्टिने ही निविदा मागविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून मागविण्यात आलेल्या निविदेनुसार 10 तालुक्यांमध्ये चारापुरवठ्याची निविदा निश्चित झाली आहे. उर्वरित तालुक्यांसाठी पुनर्निविदा काढल्या जाणार आहेत, असे जिल्हाधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.
चाराटंचाई दूर करण्यासाठी 15 कोटींची निविदा
संभाव्य चाराटंचाई दूर करण्यासाठी 15 कोटींची निविदा मागविण्यात आली आहे. यामध्ये 10 तालुक्यांमध्ये चारा पुरवठ्याची निविदा निश्चित करण्यात आली आहे. उर्वरित चार ते पाच तालुक्यांसाठी पुनर्निविदा मागविण्यात आली आहे.
- जिल्हाधिकारी नितेश पाटील