बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यासाठी दोन दिवसांत निविदा
सार्वजनिक बांधकाम खात्याची माहिती : हिंडलगा-सुळगा दरम्यान रस्ताकामाला प्रारंभ
बेळगाव : बहुचर्चित बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यासाठी एक-दोन दिवसांत निविदा काढल्या जाणार आहेत. सध्या या मार्गावर हिंडलगा ते सुळगा दरम्यान कामाला प्रारंभ झाला आहे. तर सुळगा ते बाची दरम्यानच्या रस्ताकामासाठी निविदा निघणार आहे. हिंडलगा ते बाची दरम्यानचा हा मार्ग काही अंतर चौपदरीकरण, काही अंतर नूतनीकरण तर काही ठिकाणी पॅचवर्कचे काम होणार आहे. बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यासाठी तालुका म. ए. समितीने आक्रमक भूमिका घेत रास्तारोको करून आंदोलन छेडले होते. शिवाय तातडीने कामाला सुरुवात व्हावी यासाठी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे निवेदने सादर केली आहेत. या आंदोलनाला यश आले आहे. हिंडलगा ते सुळगा गावापर्यंतचा रस्ता चौपदरीकरण होणार आहे. यासाठी 9 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तर सुळगा ते बाची दरम्यानच्या मार्गासाठी 7 कोटी रुपयांचा निधी खर्ची घातला जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याने दिली आहे.
हिंडलगा ते सुळगा दरम्यानच्या रस्त्याशेजारील झाडे हटविली जात आहेत. या मार्गावरील रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेषत: हा तीन किलोमीटरचा रस्ता चौपदरीकरण केला जाणार आहे. शिवाय या मार्गावर दुभाजक उभारला जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. सद्यस्थितीत रस्त्याशेजारी असलेली झाडे हटवून सपाटीकरण आणि रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील सुळगा ते सीमाहद्दीतील बाची दरम्यान रस्ताकामाचा विकास साधला जाणार आहे. यासाठी येत्या दोन दिवसात निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. यामध्ये तीन किलोमीटरचा रस्ता नूतनीकरण, दीड किलोमीटर डांबरीकरण तर एक किलोमीटर ड्रेन काँक्रिट व उर्वरित रस्त्याचे पॅचवर्क केले जाणार आहे.
तालुक्यातील इतर रस्त्यांचेही काम हाती
बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याबरोबरच तालुक्यातील इतर रस्त्यांची कामेही हाती घेतली जाणार आहेत. बडस, बाकनूर, बेळवट्टी आणि अतिवाड क्रॉस येथील सीमाहद्दीतील रस्त्यांचीही दुरुस्ती करून डांबरीकरण केले जाणार आहे. लवकरच या कामांना प्रारंभ होणार आहे, अशी माहितीही सार्वजनिक बांधकाम खात्याने दिली आहे.
तालुका म. ए. समितीला यश
बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यासाठी तालुका म. ए. समितीने रास्तारोको करून प्रशासनाला जागे केले. दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्याला वेळोवेळी निवेदने देऊन रस्ताकामासाठी भाग पाडले. त्यामुळेच रस्त्याच्या कामाला चालना मिळाली. मागील कित्येक दिवसांपासून समितीने या मार्गाची मागणी लावून धरली होती. त्याला आता यश आले आहे.
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर चंदगड-कोकणाची वर्दळ
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर तालुक्यातील पश्चिम भागासह चंदगड, आजरा, गडहिंग्लज यासह कोकणातील वाहनधारकांची मोठी वर्दळ आहे. त्यामुळे अलीकडे या मार्गावर वाहतुकीचा अतिरिक्त ताण वाढला आहे. या अरूंद राज्यमार्गावर वाहतूक वाढल्याने प्रवास धोकादायक ठरू लागला आहे. त्यातच पडलेल्या ख•dयांनी वाहनधारकांची कसरत होऊ लागली आहे. मात्र आता रस्ताकामाला प्रारंभ झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.