For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सदनिकधारक आजपासून घरपट्टी भरू शकतात

10:31 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
सदनिकधारक आजपासून घरपट्टी भरू शकतात
Advertisement

विभागीय कार्यालयातूनच घ्यावे लागणार चलन : सदनिकांसाठी ऑनलाईन सुविधा नाही

Advertisement

बेळगाव : घरपट्टी भरण्यासाठी महानगरपालिकेने ऑनलाईन तसेच चलनाद्वारे भरण्यासाठी जनतेला सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र संकुलातील सदनिकांना चलनही नव्हते आणि ऑनलाईन सुविधाही उपलब्ध नव्हती. त्यामुळे समस्या निर्माण झाली होती. मात्र आता त्यांच्यासाठी चलन देण्याची व्यवस्था करण्यात आली असून शुक्रवारपासून विभागीय कार्यालयांतून चलन मिळू शकते, असे महसूल विभागातून सांगण्यात आले. संकुलातील सदनिकधारकांना घरपट्टीचे चलन अद्याप उपलब्ध करून देण्यात आले नव्हते. तांत्रिक समस्या याचबरोबर दर निश्चित करणे अवघड झाल्याने त्याला विलंब झाला. मात्र आता सदनिकधारकांसाठीही चलन देण्यात येणार आहे. सवलतीच्या दरामध्ये भरण्यासाठी केवळ त्यांना चारच दिवस मिळणार आहेत. त्यामुळे त्यामध्ये वाढ करावी, अशी मागणी होत आहे.

नवीन आर्थिक वर्ष एप्रिलपासून सुरू होते. त्या महिन्यामध्ये घरपट्टी भरल्यास 5 टक्के सवलत दिली जाते. मात्र यावेळी ऑनलाईनची समस्या तसेच चलन देताना निर्माण झालेल्या अडचणी यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. याबाबत तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर महानगरपालिकेने ते काम सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. पण सवलत घेण्यासाठी शहरवासीय मोठ्या प्रमाणात पुढे आले. त्यामुळे सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडला. याचबरोबर तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन समस्या निर्माण झाली. सध्या लोकसभा निवडणुकीच्या कामात कर्मचारी गुंतले आहेत. त्याचवेळी नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. परिणामी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. तरीदेखील विभागीय कार्यालयातून चलन दिले जात होते. मात्र या चलनामध्ये अनेक चुका असल्यामुळे नागरिकांना मनपाच्या मुख्य कार्यालयाकडे धाव घ्यावी लागत होती. संकुलनामध्ये राहत असलेल्या सदनिकांच्या घरपट्टीबाबत तर गांभीर्यच दाखविण्यात आले नाही. मात्र आता त्यामधील तांत्रिक अडचणी दूर करून केवळ चलन उपलब्ध करून देण्यात आले आहे. तेव्हा जनतेने संबंधित विभागातील कार्यालयांतून चलन घेऊन घरपट्टी भरावी, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.