पाच दिवसांत भाडेकरु पडताळणी पूर्ण करावी
डिचोली : राज्यात भाडेकरू पडताळणीसाठी दिलेली 10 ऑक्टोबरपर्यंतची मुदत काल गुरुवारी संपली तरी सर्वच पोलिसस्थानकांच्या हद्दीत अनेकजणांची पडताळणी नोंदणी शिल्लक राहिल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे येणाऱ्या 5 दिवसांमध्ये सर्वांनी स्वत:हून पोलिसस्थानकांमध्ये भेट देऊन भाडेकरू पडताळणी नोंदणी करून घ्यावी. त्यानंतरही जर कोणी पडताळणी नोंदणी न केल्याचे आढळल्यास पोलिस दंडात्मक कारवाई करणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाडेकरू पडताळणी धोरण कडकपणे अवलंबल्यानंतर सर्वत्र पोलिसांकडून फिरून सदर पडताळणी करण्यात येत आहे. तसेच लोकांनाही पोलिसस्थानकात येऊन भाडेकरू पडताळणी नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनानुसार गोव्यातील प्रत्येक मालकाने आपल्याकडे असलेल्या भाडेकरूंची, आपल्याकडे कामाला ठेवलेल्या परप्रांतीय कामगारांची पडताळणी नोंदणी करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पोलिस यासाठी रू. 200 घेत असल्याची अफवा काहींनी पसरवली आहे, ती पूर्णपणे खोटी आहे.