For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाचव्या टप्प्यात दहा केंद्रीय मंत्री स्पर्धेत

06:02 AM May 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाचव्या टप्प्यात दहा केंद्रीय मंत्री स्पर्धेत
Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान आज सोमवारी होत आहे. या टप्प्यातील मतदारसंघांची संख्या केवळ 49 असली तरी त्यात 9 केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य मतदानयंत्रांमध्ये बद्ध होणार आहे. तसेच अनेक उच्चमानांकित उमेदवारांच्या सांसदीय अस्तित्वाचा निर्णय मतदार करणार आहेत. याशिवाय एक माजी मुख्यमंत्रीही खासदार होण्याच्या स्पर्धेत आहे. त्यामुळे हा टप्पा लक्षणीय ठरणार असून मतदान तीव्र चुरशीने होईल, अशी शक्यता आहे. या टप्प्यातील अनेक मतदारसंघही कोणत्या ना कोणत्या कारणाने गाजलेले आहेत. पाचवा टप्पा ही निवडणूक कोणत्या दिशेने चालली आहे, हे सुनिश्चित करेल. त्यानंतरचे दोन टप्पे तीच दिशा राखतील, असे तज्ञांचे मत आहे...

Advertisement

स्मृती इराणी (महिला आणि बालकल्याण मंत्री, अमेठी मतदारसंघ)

? भारतीय जनता पक्षाच्या धुरंधर महिला नेत्या अशी यांची ख्याती आहे. त्या अभिनय, मॉडेलिंग आणि चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रातून राजकारणात आल्या आहेत. त्यांनी 2014 ते 2016 या काळात मानवसंसाधन विकास, 2016 ते 2021 या काळात वस्त्रोद्योग, 2017 ते 2018 या काळात सूचना आणि प्रसारण, तर 2018 पासून आजवर महिला आणि बालकल्याण अशा विविध विभागांचे उत्तरदायित्व सांभाळले आहे. 2019 त्यांनी अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांचा पराभव केला होता. त्यांच्या या कामगिरीला जागतिक प्रसिद्धी मिळाली होती.

Advertisement

? ‘क्यू की सास भी कभी बहू थी’ या एकता कपूर यांच्या एकेकाळच्या गाजलेल्या टीव्ही मालिकेत त्यांची महत्वाची भूमिका अत्यंत गाजली होती. या भूमिकेसाठी त्याना सलग पाच वर्षे पुरस्कार मिळाले होते. त्यांना हिंदी, इंग्रजी, बंगाली, मराठी, पंजाबी आणि गुजराती अशा अनेक भाषा उत्तम रितीने येतात. 2001 मध्ये त्यांचे झुबीन इराणी नामक उद्योगपतीशी लग्न झाले. त्यांना दोन अपत्ये आहेत. तथापि, आपण हिंदू असून विवाह पारशी व्यक्तीशी झालेला असला तरी धर्मपरिवर्तन केलेले नाही, असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले आहे.

कौशल किशोर (गृहनिर्माण, नगर राज्यमंत्री, मोहनलालगंज मतदारसंघ)

भारतीय जनता पक्षाचे दलित समाजातील प्रसिद्ध नेते असा कौशल किशोर यांचा परिचय आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते उत्तर प्रदेशच्या मोहनलालगंज मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांना यंदा याच मतदारसंघातून हॅटट्रिकची अपेक्षा आहे. 2019 नंतरच्या कोरोना काळात त्यांच्यावर केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाच्या राज्यमंत्रीपदाचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले होते. कार्यतत्पर मंत्री आणि मोठा जनसंपर्क असलेला नेता असा त्यांचा परिचय आहे. त्यांच्या कार्याची नोंद विविध संस्थांनी घेतली आहे.

ड पासी समाजातील एक अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झालेला आहे. गरीबीमुळे त्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करता आलेले नाही. तथापि, कुशल संघटक म्हणून त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात नाव मिळविले. त्यांच्या राजकीय जीवनाचा प्रारंभ समाजवादी पक्षापासून झाला. 2002 मध्ये ते मलिहाबाद मतदारसंघातून आमदार झाले. 2003 मध्ये ते मुलायमसिंग यादव मंत्रीमंडळात मंत्रीही होते. 2007 नंतर ते भारतीय जनता पक्षात आले. ते ‘परख’ महासंघ या संस्थेचे अध्यक्ष असून भारतीय जनता पक्षाच्या दलित कक्षाचे प्रमुख आहेत.

अन्नपूर्णा देवी यादव (शिक्षण राज्यमंत्री, कोडरमा मतदारसंघ)

ड अन्नपूर्णा देवी यादव अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. झारखंडच्या कोडरमा मतदारसंघातून त्या 2019 मध्ये प्रथम लोकसभेवर निवडून आल्या आहेत. ही त्यांची द्वितीय निवडणूक आहे. 2021 मध्ये त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला. अन्य मागासवर्गीय समाजाच्या लोकप्रिय नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांच्या राजकीय कार्यकाळाचा प्रारंभ मात्र राष्ट्रीय जनता दलातून झाला होता. गेल्या 15 वर्षांपासून त्या भारतीय जनता पक्षात असून पक्षसंघटनेत त्यांनी प्रभावी काम केले आहे.

ड राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारीवर त्यांनी कोडरमा विधानसभा मतदारसंघातून झारखंडच्या विधानसभेची निवडणूकही जिंकली होती. तथापि, पुढे पक्षनेतृत्वाशी त्यांचे मतभेद निर्माण झाल्याने त्यांनी राजदचा त्याग करुन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षाही आहेत. संघटन कौशल्य आणि प्रभावी वक्तृत्वासाठी त्या प्रसिद्ध आहेत. 1998 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करुन पतीची परंपरा पुढे चालविली आहे. यंदाची लोकसभा निवडणूक त्यांची द्वितीय निवडणूक आहे.

राजनाथसिंग (संरक्षणमंत्री, लखनौ मतदारसंघ)

ड राजनाथसिंग भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांच्या समाजकार्याचा प्रांरभ झाला. ते उत्तर प्रदेशच्या लखनौ मतदारसंघातून स्पर्धेत आहेत. हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा गढ मानला जातो. दिवंगत माजी पंतप्रधान अलटबिहारी वाजपेयीही याच मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत असत. त्यांच्या निवृत्तीनंतर राजनाथसिंग या मतदारसंघाची धुरा सांभाळत असून, ते सलग चौथ्यांदा येथून स्पर्धेत आहेत. गेली 5 वर्षे त्यांनी देशाच्या संरक्षण विभागाचा पदभार हाताळला असून त्यांना विजय अपेक्षित आहे.

ड 73 वर्षांच्या राजनाथसिंग यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा 2000 ते 2002 या काळात सांभाळली होती. वाजपेयी सरकारच्या काळात ते केंद्रामध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री या नात्याने मार्ग परिवहन, महामार्ग आणि कृषी इत्यादी विभाग हाताळले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रथम कार्यकाळात त्यांच्याकडे गृहविभागाचे उत्तरदायित्व सोपविण्यात आलेले होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेले ते प्रथम गृहमंत्री होते. 2002 ते 2008 आणि नंतर 2009 ते 2014 या काळात त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणूनही सरस कामगिरी केलेली आहे.

पियुष गोयल (उद्योग आणि व्यापार मंत्री, मुंबई उत्तर मतदारसंघ)

ड भारतीय जनता पक्षाचे पूर्वीचे नेते वेदप्रकाश गोयल यांचे पुत्र पियुष गोयल केंद्रात उद्योग आणि व्यापार मंत्री आहेत. त्यांच्याकडे वस्त्रोद्योग, अन्न आणि वितरण असे विभागही आहेत. ते मुंबई उत्तर या मतदारसंघातून उमेदवार असून ही त्यांची प्रथमच लोकसभा निवडणूक आहे. याच मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत निवडून आलेल्या गोपाळ शेट्टी यांच्यास्थानी त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 60 वर्षांचे गोयल हे व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. भारतीय जनता पक्षासाठी ते दोन दशकांहून अधिक काळ कार्य करीत आहेत.

ड 2014 ते 2017 या काळात त्यांनी कोळसा, ऊर्जा, पुनउ&पयोगी ऊर्जा असे महत्वाचे विभाग कॅबिनेट मंत्री या नात्याने सांभाळले आहेत. 2017 ते 2021 या काळात ते रेल्वेमंत्री होते. कोरोना काळात त्यांच्या नेतृत्वात रेल्वेने 200 प्रलंबित आणि रखडलेले प्रकल्प पूर्ण केल्याने कार्यक्षम मंत्री अशी त्यांची प्रसिद्धी झाली होती. ग्राहक कल्याण विभागाचे कॅबिनेट मंत्री या नात्याने त्यांनी ग्राहकांना दर्जेदार उत्पादने मिळवून देण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेतले होते. बीआयएस कायदा, लिगल मेट्रोलॉजी कायदा ही त्यांची संकल्पना मानली जात आहे.

डॉ. भारती पवार (आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री, दिंडोरी मतदारसंघ)

ड डॉ. भारती पवार यांनी त्यांच्या राजकीय कार्यकाळाचा प्रारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केला होता. 2014 ची लोकसभा निवडणूक त्यांनी याच पक्षाच्या उमेदवार म्हणून लढविली होती. मात्र, त्यांचा भारतीय जनता पक्षाकडून पराभव झाला होता. 2019 मध्येही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली होती. ती मानली गेली नाही. नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन उमेदवारी मिळविली आणि त्या निवडूनही आल्या. त्यांचे सासरे हे काँग्रेसचे आठ वेळा आमदार होते आणि विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री होते.

ड दिंडोरी मतदारसंघातून त्यांची ही दुसरी निवडणूक आहे. 2021 मध्ये त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या रुपाने तब्बल 59 वर्षांच्या नंतर महाराष्ट्रातील नाशिक विभागाला केंद्रात मंत्रीपद मिळाले आहे. तसेच त्या नाशिक विभागातील प्रथम महिला केंद्रीय मंत्री ठरल्या आहेत. सक्षम मंत्री म्हणून त्यांनी अल्पावधीच प्रसिद्धी मिळविली आहे. मंत्री होण्यापूर्वी त्यांनी लोकसभेच्या स्थायी समितीच्या सदस्या म्हणून कार्य केले आहे. मोठ्या जनसंपर्क कौशल्याचा वारसा त्यांना त्यांच्या कुटुंबाकडूनच परंपरागत मिळाला आहे.

शांतनू ठाकूर (बंदरे, नौकावाहतूक राज्यमंत्री, बनगांव मतदारसंघ)

ड पश्चिम बंगालमधील बनगांव मतदारसंघातून शांतनू ठाकूर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला आहे. ही त्यांची द्वितीय निवडणूक आहे. हा मतदारसंघ परिसीमनानंतर निर्माण झाला असून तेथे प्रथम लोकसभा निवडणूक 2009 मध्ये झाली होती. पहिल्या दोन्ही निवडणुका तृणमूल काँग्रेसने जिंकल्या होत्या. 2019 मध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षाचा विजय झाला आहे. ठाकूर यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश 2021 मध्ये करण्यात आला आहे. ठाकूर हे 42 वर्षांचे असून मंत्रीमंडळातील तरुण मंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश आहे.

ड त्यांचे पिता मंजूल कृष्ण ठाकूर हे तृणमूल काँग्रेसचे 2011 मध्ये निवडून आलेले आमदार होते. त्यांचे मोठे बंधू कपिल कृष्ण ठाकूर हे तृणमूल काँग्रेसचे बनगांव मतदारसंघातील खासदार होते. शांतनू ठाकूर यांचे बंधू सुब्रत ठाकूर यांनीही 2015 मध्ये बनगांव लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर लढविली होती. तथापि, त्यांचा पराभव झाला होता. अशा प्रकारे ठाकूर यांच्या कुटुंबातील जुन्या पिढीतील व्यक्ती तृणमूल काँग्रेसमध्ये तर नव्या पिढीतील व्यक्ती भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत आहेत.

साध्वी निरंजन ज्योती (ग्राहक कल्याण राज्यमंत्री, फतेपूर मतदारसंघ)

ड भारतीय जनता पक्षाच्या अन्य मागासवर्गीय समाजातील महत्वाच्या नेत्या म्हणून परिचय असलेल्या निरंजन ज्योती या संन्यासिनी आहेत. त्यामुळे त्यांना साध्वी म्हणून ओळखले जाते. 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये त्या उत्तर प्रदेशातील फतेपूर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. 2014 मध्येच त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाला होता. त्यांनी अन्न प्रक्रिया उद्योग, ग्रामीण विकास आदी विभाग राज्यमंत्री या नात्याने सांभाळले आहेत. सध्या त्यांच्याकडे ग्राहक कल्याण विभागाचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.

ड कट्टर हिंदुत्ववादी नेत्या अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांची अनेक विधाने गाजली आहेत. जून 2014 मध्ये त्या एका कार्यक्रमाहून परतत असताना त्यांच्याव गोळीबार झाला होता. पण त्या सुखरुप वाचल्या आणि त्यांचा अंगरक्षक जखमी झाला होता. त्यांचा जन्म निर्धन कुटुंबात झाला असून बालवयातच त्यांना अध्यात्माची गोडी लागलेली होती. 2000 पासून त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत. 2012 मध्ये त्यांनी हमीरपूर मतदारसंघातून उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक जिंकलेली होती. कुशल संघटक अशी त्यांची ख्याती आहे.

भानूप्रताप वर्मा (सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग राज्यमंत्री, जालौन मतदारसंघ)

ड भारतीय जनता पक्षाचे दलित समाजातील प्रभावशाली नेते अशी भानू प्रताप सिंग वर्मा यांची ख्याती आहे. 67 वर्षांचे वर्मा हे पक्षाचे अनुभवी आणि प्रदीर्घ काळ कार्यरत असणारे नेते आहेत. जालौन या उत्तर प्रदेशातील मतदारसंघातून ते प्रथम 1996 मध्ये लोकसभेवर निवडले गेले. त्यानंतर 1998 च्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर 2004, 2014 आणि 2019 अशा तीन निवडणुका त्यांनी याच मतदारसंघातून त्यांनी सहज जिंकल्या आहेत.  ते तरुण वयापासूनच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत.

ड ते उत्तर प्रदेशच्या कोळी समाजातील नेते असून त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. अन्य समाजांमध्येही त्यांना तळमळीने काम करणारा नेता म्हणून ओळखले जाते.  ते उच्चशिक्षित असून त्यांचे शिक्षण एम. ए. एल. एल. बी. इतके आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी वकीलीच्या व्यवसायातही यश मिळविले होते. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध असून भारतीय जनता पक्षाच्या अनेक पदांवर राहून त्यांनी पक्षसंघटनेचे कार्य उत्तमरित्या केले आहे. चांगले वक्ते म्हणूनही त्यांना ओळखले जाते. 2021 पासून ते केंद्रीय मंत्रीमंडळात समाविष्ट आहेत.

कपिल पाटील (पंचायत राज राज्यमंत्री, भिवंडी मतदारसंघ)

ड महाराष्ट्राच्या भिवंडी मतदारसंघातून कपिल पाटील यांनी 2014 आणि 2019 अशा दोन निवडणुकांमध्ये विजय मिळविला आहे. 2021 मध्ये त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला. महाराष्ट्राच्या कोळी समुदायातील नेते म्हणून त्यांचा परिचय आहे. त्यांचे शिक्षण बी. ए. पर्यंत झाले असून त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतलेले आहे. संघटक आणि वक्ता अशी त्यांची ख्याती आहे. कोळी समाजाचे ते प्रथम केंद्रीय मंत्री ठरलेले आहेत. ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काही वर्षे कार्य केलेले आहे.

ड संसदेच्या नगरविकास संबंधी स्थायी समितीचे सदस्य म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केलेली आहे. लोकसभेत त्यांनी त्यांचा मतदारसंघ आणि त्यांच्या क्षेत्रासंबंधीचे प्रश्न कळकळीने मांडले आहेत. यावेळी ते भिवंडी मतदारसंघातून हॅटट्रिक साधण्याच्या प्रयत्नात आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांनी या मतदारसंघात पक्षसंघटन बळकट केले असून कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली आहे. भिवंडी मतदारसंघाच्या ग्रामीण भागात त्यांचा प्रभाव विशेषत्वाने आहे. दोन्ही निवडणुकांमध्ये ते समाधानकारक मताधिक्क्याने विजयी झालेले आहेत.

Advertisement
Tags :

.