बीएलएफच्या हल्ल्यात 10 पाकिस्तानी सैनिक ठार
बलुचिस्तानात अनेक ठिकाणी घडवून आणले हल्ले
वृत्तसंस्था/ क्वेटा
बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटने (बीएलएफ) केलेल्या अनेक हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे 10 सैनिक ठार झाले आहेत. बीएलएफच्या सदस्यांनी झाओ, बरखान, तुम्प आणि तुरबतमध्ये अनेक हल्ले घडवून आणले, ज्यात पाकिस्तानच्या 10 सैनिकांना जीव गमवावा लागला आहे. यापूर्वी बीएलएफने केलेल्या हल्ल्यांमध्ये कमीतकमी 15 सैनिकांचा मृत्यू झाला होता. बीएलएफच्या सदस्यांनी अवारान जिल्ह्याच्या झाओ क्षेत्रात पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 8 पाकिस्तानी सैन्य जागीच ठार झाले, तर तीन सैनिक गंभीर जखमी झाले अशी माहिती बीएलएफचे प्रवक्ते मेजर जनरल गोहरम बलोच यांनी दिली आहे.
तर बरखान जिल्ह्याच्या राखनीनजीक स्त्राती-टिक भागात बीएलएफने एका सैन्यशिबिराला लक्ष्य केले आहे. बीएलएफच्या सदस्यांनी येथे रॉकेट्स, ग्रेनेड्सचा वापर केला, या हल्ल्यात दोन सैनिकांना जीव गमवावा लागला. बीएलएफने तुंपच्या गोमाजी भागात तिसरा हल्ला केला, जेथे सुरक्षा दलांच्या एका चौकीवर अनेक ग्रेनेड फेकण्यात आल्याने पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले.
तर मध्य तुरबतच्या नौदल तळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाकिस्तानी नौसैनिकांच्या दिशेने ग्रेनेड फेकण्यात आले. या हल्ल्यात अनेक नौसैनिक जखमी झाले आहेत. तेथील विस्फोटानंतर पाकिस्तानी सैन्याने परिसरातील गस्त वाढविली आहे. तर बीएलएफने ‘स्वतंत्र बलुचिस्तान प्राप्त होईपर्यंत’ सशस्त्र हल्ले जारी ठेवण्याची स्वत:ची प्रतिबद्धता पुन्हा व्यक्त केली आहे.