वर्षारंभी होणार दहा खाण डंपचा लिलाव
डंप लिलावासाठी सुधारित धोरण तयार : 12 ब्लॉकचा लिलाव, 5 वर काम सुरू
पणजी : राज्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय पुन्हा नव्या दमाने सुरू व्हावा यासाठी सरकारने जोरदार प्रयत्न चालविले असून त्याचाच भाग म्हणून नवीन वर्षात जानेवारी महिन्यात तब्बल दहा खाण डंपचा लिलाव करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासंबंधित प्रक्रिया प्रारंभ झाली आहे, अशी माहिती खाण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. राज्यात आतापर्यंत 12 खाण ब्लॉकचा लिलाव करण्यात आला असून त्यापैकी 5 ब्लॉकवर काम सुरू झाले आहे. त्यामध्ये शिरगाव येथील राजाराम बांदेकर खाण आणि कुडणे येथील जेएसडब्ल्यू या मिनरल ब्लॉकसह अन्य खाणींचा समावेश आहे. या पाचही खाण ब्लॉकमधून दरवर्षी अंदाजे 5.3 दशलक्ष टन खनिज उत्पादन होण्याची शक्यता सदर अधिकाऱ्याने वर्तविली आहे. आता राज्य सरकारने डंपच्या लिलावासाठी सुधारित धोरण तयार केले आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यापासून टप्प्याटप्प्याने लिलाव प्रकिया सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात 10 डम्पचा लिलाव करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे राज्यातील खाण व्यवसायाला मोठा दिलासा मिळणार आहे.
खाण व्यवसायाला मिळणार चालना
सरकारने खासगी जमिनीवरील डम्प मालाचा लिलाव करण्यासही यापूर्वी मान्यता दिली आहे. हा माल सुमारे 22 दशलक्ष टन एवढा आहे. यासाठी डंपच्या लिलावासाठीचे शुल्कही निश्चित करण्यात आले आहे. अशाप्रकारे खाण ब्लॉकमधून खनिज उत्खनन आणि डम्प मालाच्या निर्यातीमुळे खाण व्यवसायाला सकारात्मक चालना मिळणार असून ट्रक आणि बार्ज व्यवसायीकांना मोठ्या प्रमाणात काम मिळाल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही लाभ होणार होणार असल्याची अपेक्षा सदर अधिकाऱ्याने वर्तविली.
लिलाव होणाऱ्या 12 खाणी
राज्य सरकारने डंप मालाच्या लिलावासाठी सुधारित धोरण तयार केल्याने एकूण 12 खाणींच्या ठिकाणी पडून असलेल्या मालाचा लिलाव प्रक्रियेत वेदांताच्या ब्लॉक 1 (डिचोली), ब्लॉक 7 (कुडणे), साळगावकर शिपिंग ब्लॉक 2 (शिरगाव), राजाराम बांदेकर ब्लॉक 3 (शिरगाव), फोमेंतो ब्लॉक 4 (काले-सांगे), ब्लॉक 5 (थिवी, अडवपाल), जेएसडब्ल्यू कुडणे (ब्लॉक 6), ब्लॉक 9 (सुर्ला-सत्तरी), ब्लॉक 12 (कोडली) हे तीन आणि काय इंटरनॅशनलच्या ब्लॉक 8 (थिवी-म्हापसा), अग्रवन्शी प्रा. लि. चा ब्लॉक 10 (होंडा), ब्लॉक 11 (कुर्पे-सांगे) यांचा समावेश आहे.
ऑक्टोबरमध्ये 2 डम्प मालाला मंजुरी
सरकारने डंप मालाच्या लिलावासाठी पहिल्या टप्प्यात तीन खाणींना मंजुरी दिली होती. त्यात वेदांता-डिचोली, साळगावकर शिपिंग शिरगाव आणि फोमेंतो-थिवी (ब्लॉक 5) यांचा समावेश होता. आता गत ऑक्टोबर महिन्यात राजाराम बांदेकर शिरगाव (ब्लॉक 3) आणि जेएसडब्ल्यू कुडणे (ब्लॉक 6) या अन्य दोन कंपन्यांना डंपच्या लिलावासाठी मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित 10 खाणीच्या डंपचा लिलाव जानेवारीत होणार आहे.
खाजगी डंप धोरणातील बदल
सरकारने 2023 नुसार खाजगी जागेतील डंप धोरणात बदल केले आहेत. त्यासाठी दोन टप्पे निर्धारित केले असून पहिला टप्पा मंजूर डंप धोरण तर दुसरा टप्पा डंप लिलाव धोरण आहे. सरकारने खासगी जागेत पडून असलेला माल तसेच ऊपांतरण फी न भरलेल्या 23 डंप जागा शोधल्या आहेत. या दोन्ही टप्प्यांसाठी स्वतंत्र प्रोफाईल तयार केली आहे. एकुण 26 पैकी 10 जागामधील मालाचा लिलाव होणार आहे. त्यात उत्तर गोव्यात होंडा येथे केवळ एका जागेचा तर उर्वरित ऊपांतरण फी न भरलेल्या नऊ जागा दक्षिणेत आहेत.