दहा लाख लाडक्या बहिणींना मिळणार 304 कोटी
कोल्हापूर / विनोद सावंत :
जिल्ह्यातील 10 लाख 13 हजार 630 लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा 1500 रूपयांचा हप्ता शुक्रवारी दि.7 रोजी जमा होणार आहे. तर मार्च महिन्यांचा हप्ता अर्थसंकल्पानंतर जमा होणार आहे. यामुळे जिल्ह्यात सुमारे 304 कोटी 8 लाख 90 हजार रूपयांचे वाटप या महिन्यांत होणार आहे. चारचाकी असणारे तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचा सर्व्हे सुरू असून याबाबत अद्यपी शासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या महिन्यांत त्यांनाही या योजनेचा लाभ होणार आहे.
विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. पात्र लाभार्थ्यांना 1500 रूपये दिले जात आहेत. जानेवारी अखेरपर्यंत या योजनेचे सात हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. आठवा हप्ता फेब्रुवारी महिना झाला तरी मिळालेला नाही. यावरून विरोधकांनी या योजनेबाबत टिका सुरू केली. नुकतेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी फेब्रुवारी महिन्यातील देय रक्कम महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 7 मार्च रोजी खात्यात जमा होणार असून मार्च महिन्याचे पैसे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर याच महिन्यात दिले जातील, असे स्पष्ट केले आहे.
- जिल्ह्यातील लाडक्या बहिण योजनेतील लाभार्थ्यांची स्थिती
पोर्टोल नोंदणी अपात्र पात्र
357358 6501 350857
अॅपवर नोंदणी अपात्र पात्र
696777 34004 662773
एकूण पात्र लाभार्थी -10 लाख 13 हजार 630
अपात्र लाभार्थी - 40 हजार 505
फेब्रुवारीचा हप्ता- 1500
वाटप होणारी एकूण रक्कम-152 कोटी 4 लाख 45 हजार
- 67 लाभार्थ्यांची 1500 रूपये बंद होणार
राज्य शासनाने लाडकी बहिण योजनेसंदर्भात पात्र नसणाऱ्या लाभार्थ्यांनी स्वत:हून योजनेतून नाव वगळण्याचा अर्ज करावा, असे आवाहन केले होते. यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 67 लाभार्थ्यांनी अर्ज केला असून त्यांना या महिन्यापासून या योजनेचा लाभ बंद होणार आहे.
सुहास वाईंगडे, जिल्हा महिला विकास अधिकारी
- मंत्रालयाच्या पातळीवर संबंधित लाभार्थ्यांबाबत निर्णय
चार चाकी असणाऱ्या, संजय गांधी निराधार योजना, नमो शेतकरी योजनेतील लाभार्थी असणाऱ्यांना लाडकी बहिण योजनेतून वगळण्यात येणार आहे. सध्या हा सर्व्हे सुरू आहे. राज्य भरातील माहिती एकत्र झाल्यानंतर मंत्रालयाच्या पातळीवर संबंधित लाभार्थ्यांबाबत अंतिम निर्णय होणार आहे. यानंतरच या लाभार्थ्यांचे नावे लाभार्थी यादीतून वगळली जाणार आहे. यामुळे 7 मार्च रोजी संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावरही 1500 रूपयांचा हप्त वर्ग होणार आहे.
- प्रादेशिक परिवहन विभागाकडून यादी घेणार
सर्व्हेसाठी गेल्यानंतर काही लाभार्थी चारचाकी वाहन असल्याचे तर काही लाभार्थी वाहन नसल्याचे सांगत आहेत. यामुळे सत्य स्थिती समोर येण्यासाठी आता प्रादेशिक परिवहन विभागाकडून चारचाकी वाहन असणाऱ्यांची यादीच घेतली जाणार आहे. यामध्ये ज्या लाभार्थ्याच्या घरी चारचाकी असेल त्यांचे नाव लाभार्थी यादीतून वगळून पैसे जमा करणे बंद केले जाणार आहे.
- फेब्रुवारीचा हप्ता 1500 मिळणार
लाडकी बहिण्यांना सध्या 1500 रूपये मिळत असून ही रक्कम वाढवून 2100 रूपये करण्याचे राज्य शासनाच्या विचारधीन आहे. परंतू याबाबत कोणतेही लेखी आदेश आले नसल्याने फेब्रुवारीचा हप्ता 1500 असणार आहे.