For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव शहरासह तालुक्यातील दहा गुन्हेगार तडीपार

11:00 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव शहरासह तालुक्यातील दहा गुन्हेगार तडीपार
Advertisement

इतर जिल्ह्यात रवानगी : पोलीस उपायुक्तांचा आदेश

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने कंबर कसली आहे. निवडणूक प्रक्रिया सुसूत्रपणे पार पडावी यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींवर कारवाईचा सपाटा सुरू असून बेळगाव शहर व तालुक्यातील दहा जणांना तडीपार करण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी तडीपारीच्या आदेशांना मंजुरी दिली असून कारवार, धारवाड, विजापूर, बागलकोटसह वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांना सोडून देण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्थानिक पोलिसांची तडीपार झालेल्यांवर नजर असणार आहे. गेल्या आठ दिवसात एकूण दहा जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. मार्केट व खडेबाजार उपविभागातील प्रत्येकी 3 व बेळगाव ग्रामीण उपविभागातील चौघा जणांना तडीपार करण्याच्या प्रस्तावावर पोलीस उपायुक्तांनी स्वाक्षरी केली आहे. यासंबंधीचे आदेश जारी झाल्यानंतर स्थानिक पोलीस त्यांना ताब्यात घेऊन ज्या जिल्ह्यात तडीपार करण्याचा आदेश देण्यात आला आहे, तेथे पोहोचवून येत आहेत. माळमारुती, मार्केट, खडेबाजार, मारिहाळ, बेळगाव ग्रामीण, शहापूर, काकती व हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येकी 1 व टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील दोघा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावांना पोलीस उपायुक्तांनी मंजुरी दिली आहे. या कारवाईने एकच खळबळ माजली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे व सुसूत्रपणे पार पडावी यासाठी काळ्या यादीतील गुन्हेगारांना बोलावून त्यांना तंबी देण्याबरोबरच पोलीस दलाने तडीपारीची कारवाईही सुरू केली आहे. आणखी काही प्रस्ताव उपायुक्तांसमोर असल्याची माहिती मिळाली आहे. यासंबंधी पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्याशी संपर्क साधला असता दहा जणांच्या तडीपारीच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला.

Advertisement
Advertisement
Tags :

.