Solapur news | उन्हाळी सुट्टीत 'पोहण्याचा मोह' पडू शकतो महागात! जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी
सोलापूर जिल्ह्यातील धोकादायक पाणीसाठ्यांवर बंदी
सोलापूर -शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे सुट्टीत अनेक मुले साठलेल्या पाण्याच्या ठिकाणी पोहण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. मात्र, धोकादायक पाणीसाठवणुकीच्या ठिकाणी अनेक मुलांचा जीव जात असल्याने धोकादायक तलाव, बंद विहिरी, शेततळे या ठिकाणी पोहण्यासाठी प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत.
मुलांना पोहण्याचा मोह आवरत नसल्यामुळे जिल्ह्यातील खाणी, शेततळे, भरलेल्या विहिरी याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसील कार्यालयांना दिल्या आहेत. त्यानुसार तहसील कार्यालयाकडून स्वतंत्र आदेश काढण्यात आले आहेत.
मुलांना सुट्ट्या लागल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने यावर्षी पहिल्यांदाच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १६३
(पूर्वीच फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४) च्या तरतुदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर जिल्ह्यात बंद पडलेल्या दगड खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठून धोकादायक पाणीसाठा बऱ्याच ठिकाणी धोकादायक असल्याची बाब समोर आलेली आहे. अशा ठिकाणी नागरिक तसेच छोटी मुले, महिला कपडे धुण्यासाठी, पोहण्यासाठीजातात. अनेकांना पोहता येत नसल्याने दुर्घटना घडून यात अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
सध्या उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परीक्षा संपत आहेत. शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर मुले पोहायला जातात. त्यामुळे या काळात अशा धोकादायक ठिकाणी कोणी जाणार नाही याकरिता धोक्याच्या सूचनांचा फलक दर्शनी भागात लावावा, असे स्पष्ट आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
प्रत्येक गावातील बंद पडलेल्या पावसाच्या पाण्याचा साठा झालेल्या दगड खाणी, निर्जन नदी किनारा, तलाव, कालवा, मोठी डबकी अशा ठिकाणांचा शोध घेऊन याठिकाणी अनुचित दुर्घटना घडू नये याकरिता त्या परिसरामध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार उपाययोजना करण्याचे आदेश तहसीलदारांना अपर जिल्हादंडाधिकारी अभिजित पाटील यांनी दिले आहेत. १५ जूनपर्यंत हे निर्बंध असणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.