For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रम्प यांच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती

06:55 AM Jan 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
ट्रम्प यांच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती
Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

Advertisement

अमेरिकेत जन्म झालेल्या व्यक्तीला अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्याचा अधिकार रद्द करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाला अमेरिकेच्या संघराज्यीय न्यायालयाच्या एका न्यायाधीशाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. ट्रम्प यांनी हा आदेश त्यांच्या शपथविधीनंतर त्वरित लागू केला होता. त्यानंतर त्याला अमेरिकेतील विविध प्रांतांच्या न्यायालयांमध्ये आव्हान देण्यात आले आहे.

सिएटल येथील संघराज्यीय (फेडरल) न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हा आदेश पूर्णत: घटनाबाह्या असल्याची टिप्पणी करत त्याला स्थगिती दिली. भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी रात्री उशिरा ही सुनावणी न्यायाधीश जॉन कोगेनर यांच्यासमोर झाली. ही सुनावणी लवकरात लवकर घ्यावी, अशी विनंती वॉशिंग्टन प्रांताचे महाधिवक्ता निक ब्राऊन यांनी केली होती. या स्थगिती आदेशामुळे ट्रम्प यांच्या आदेशाचे क्रियान्वयन 14 दिवस करता येणार नाही. त्यानंतर मुख्य सुनावणी केली जाण्याची शक्यता आहे. कोगेनर हे गेली चाळीस वर्षे न्यायाधीशपदी आहेत. जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या अधिकारासंदर्भात अमेरिकेच्या घटनेत अत्यंत स्पष्ट तरतुदी आहेत. ट्रम्प यांचा आदेश या तरतुदींचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे अस्थायी स्थगिती दिली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद

ट्रम्प यांच्या आदेशामुळे मोठी अनिश्चितता निर्माण होणार आहे. जन्म होण्याची प्रक्रिया रोखली जाऊ शकत नाही. अमेरिकेच्या घटनेत करण्यात आलेल्या 14 व्या सुधारणेनुसार अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेल्या सर्वांना नागरिकत्वाचा जन्मसिद्ध अधिकार देण्यात आलेला आहे. तो केवळ एक प्रशासकीय आदेश काढून रद्द केला जाऊ शकत नाही. हा आदेश लागू झाला, तर प्रत्येक वर्षी अमेरिकेत जन्मणाऱ्या 1 लाख 50 हजारांहून अधिक अपत्यांना नागरिकत्वाचा अधिकार नाकारला जाणार आहे. याचे अमेरिकेवर दीर्घकालीन विपरीत परिणाम होणार आहेत. त्यामुळे स्थगिती देण्यात यावी असा युक्तीवाद न्यायालयासमोर करण्यात आला.

ट्रम्प यांच्या वतीने युक्तिवाद

ट्रम्प यांचा आदेश तो काढल्यापासून 30 दिवसांच्या नंतर लागू होणार आहे. हा प्रश्न त्वरित विचारात घेण्याइतका तातडीचा नाही. या आदेशामुळे अमेरिकेचे नागरिक नसलेल्यांच्या पोटी अमेरिकेत जन्माला आलेल्या सर्व अपत्यांचे नागरिकत्व रद्द होणार नाही. हा आदेश पूर्वलक्षी परिणामानुसार लागू करण्यात आलेला नाही. हा आदेश काढल्यानंतर 30 दिवसांच्या पुढे जी मुले अमेरिकेत जन्मतील त्यांच्यापैकी काही जणांवर परिणाम करणारा आहे. त्यामुळे ही गंभीर बाब मानता येणार नाही, असा युक्तिवाद राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावतीने करण्यात आला.

आदेश नेमका काय...

आपण अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यास नागरिकत्वाचा जन्मसिद्ध अधिकार रद्द करणार आहोत, असे आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीच्या आधी दिले होते. अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासांमध्येच त्यांनी हे आश्वासन एक प्रशासकीय अध्यादेशाच्या माध्यमातून पूर्ण केले. या आदेशानुसार अमेरिकेत जन्मलेल्या अपत्याच्या मातापित्यांपैकी एकजण अमेरिकेचा नागरीक असेल किंवा अमेरिकेचा स्थायी निवासी (ग्रीन कार्ड होल्डर) असेल तर अशा अपत्याला अमेरिकेचे जन्मजात नागरिकत्व मिळू शकते. मात्र, माता आणि पिता यांच्यापैकी कोणीही अमेरिकेचे नागरिक नसतील, किंवा स्थायी निवासी नसतील, तर अशा अपत्याला अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही. अशा अपत्याला त्याच्या वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत अमेरिकेत राहता येईल. मात्र त्यानंतरच्या वास्तव्यासाठी त्याला कोणता ना कोणता वास्तव्य व्हिसा काढावा लागेल. तसेच हा प्रशासकीय आदेश 20 फेब्रुवारी 2025 पासून लागू होईल. त्यावेळेपर्यंत अमेरिकेत जन्मलेल्या अपत्याला नागरिकत्व मिळू शकणार आहे. सध्या या आदेशाची भारतासह जगभरात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

Advertisement
Tags :

.