बस तिकीट दरवाढीपासून तूर्तास दिलासा
सध्या दरवाढीचा प्रस्ताव नाही : परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकीट दरात तातडीने वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारपुढे नाही, असे स्पष्टीकरण परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांनी दिले. त्यामुळे बस तिकीट दरवाढीच्या वृत्तामुळे हैराण झालेल्या प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
बेंगळूरमध्ये सोमवरी पत्रकारांशी ते बोलत होते. केएसआरटीसी आणि इतर परिवहन निगमच्या बस तिकिटाचे दर सध्यातरी वाढवले जाणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी चिंता करण्याची गरज नाही. बस प्रवास दरात वाढ करण्याचा विचार सध्या सुरू नाही. यापूर्वी परिवहन महामंडळाने तिकीट दरवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, सध्या तसा प्रस्ताव सादर करण्यात आला नसल्याची पुष्टी मंत्री रामलिंगारेड्डी यांनी केली आहे.
दरवाढीचा निर्णय राज्य सरकार घेईल, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तिकीट दरवाढीची शिफारस करण्यात आली असली तरी अंतिम निर्णय सरकारवर अवलंबून आहे. परिवहन महामंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार असून तिकीट दरासंबंधी कोणतेही बदल करण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे ते म्हणाले.