पोक्सो प्रकरणात येडियुराप्पांना तात्पुरता दिलासा
विशेष न्यायालयाच्या समन्सला उच्च न्यायालयाची स्थगिती
प्रतिनिधी/ .बेंगळूर
पोक्सो प्रकरणासंबंधी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना सुनावणीला हजर राहण्यासाठी बेंगळूरमधील प्रथम जलदगती न्यायालयाने समन्स बजावले होते. या समन्सला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात येडियुराप्पा यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
आपल्याविरोधात दाखल झालेले पोक्सो प्रकरण रद्द करावे, अशी याचिका येडियुराप्पांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. दरम्यान, बेंगळूरमधील प्रथम जलदगती न्यायालयाने येडियुराप्पांना समन्स बजावून 15 मार्च रोजी सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. उच्च न्यायालयाने या समन्सला स्थगिती देत येडियुराप्पांना वैयक्तिक उपस्थितीतून सूट दिली आहे. यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. येडियुराप्पांच्या याचिकेवर सुनावणी होणे आवश्यक आहे, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
मदत मागण्यासाठी येडियुराप्पांच्या निवासस्थानी आल्यानंतर येडियुराप्पा यांनी आपल्या मुलीचे लैंगिक शोषण केले, असा आरोप एका महिलेने केला होता. यासंबंधी त्या महिलेने येडियुराप्पांविरुद्ध 14 मार्च 2024 रोजी तक्रार दिली होती. याच्या आधारे येडियुराप्पांविरुद्ध पोक्सो प्रकरणांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. नंतर सरकारने हे प्रकरण चौकशीसाठी सीआयडीकडे सोपविले होते. सीआयडीने तपास करून आरोपपत्र दाखल केले होते.