क्षुल्लक कारणावरून सदाशिवनगर येथे टेम्पोची तोडफोड
बेळगाव : सदाशिवनगर, पहिला क्रॉस येथे दोन वाहने मागे-पुढे घेण्यावरून झालेल्या वादावादीनंतर एका मालवाहू टेम्पोच्या काचा फोडण्यात आल्या. मंगळवार दि. 7 रोजी ही घटना घडली असून हे प्रकरण एपीएमसी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. पहिला क्रॉस, सदाशिवनगर येथे रस्ता अरुंद आहे. रात्री या रस्त्यावरून एकाचवेळी दोन वाहने समोरासमोर आल्याने ती रस्त्यात अडकून पडली. त्यावेळी वाहने मागे-पुढे घेण्यावरून चालकांमध्ये वादावादी झाली. त्यावेळी मालवाहू टेम्पोच्या काचा फोडण्यात आल्या. या घटनेमुळे परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक यु. एस. अवटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली. पण या प्रकरणी तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नसल्याचे निरीक्षक अवटी यांनी सांगितले.