Sangli News : कृष्णा कॅनॉलजवळ टेम्पोची धडक, ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
पलूस-आमणापूर रस्त्यावर दुर्दैवी अपघात
पलूस : पलूस-आमणापूर रस्त्यावर कृष्णा कॅनॉलजवळ भरधाव दूध वाहतूक करणाऱ्या चारचाकी टेम्पोच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पलूस येथील भारती विद्यापीठा समोर राहणारे अशोक महादेव मोरे (वय ६५) हे रात्रीच्या सुमारास घरातून कृष्णा कॅनॉललगत असलेल्या शेताकडे जात असताना अतुल माळी यांच्या द्राक्ष बागेजवळआले असता, पलूसच्या दिशेने येणाऱ्या दूध वाहतुकीच्या चारचाकी छोट्या टेम्पोने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली.
गणेश शहाजी सूर्यवंशी (वय २७, रा. मोराळे, ता. पलूस) असे चालकाचे नाव आहे. हा चालक हयगयीने व अविचाराने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या अपघातात अशोक मोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी मयत यांचा मुलगा अमित अशोक मोरे यांनी पलूस पोलीस ठाण्यात वर्दी दिली असून अधिक तपास हावलदार भोपळे करीत आहेत.