कळेत चहाच्या दुकानात भरधाव वेगाने आलेला टेम्पो घुसला अन्...
दोन दुचाकी व दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
कळे : कोल्हापूर - गगनबावडा मार्गावरील कळे- मल्हारपेठ फाट्यावर चहाच्या दुकानात भरधाव वेगाने आलेला टेम्पो घुसला. यात रस्त्याकडेला लावलेल्या दोन दुचाकी व दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.
कळे -मल्हारपेठ फाट्यावर प्रसाद पोवार यांचे चहा दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे दुकानात ग्राहकांना चहा बनवून देत होते. दुपारी गर्दी होती. दरम्यान जनावरांची वाहतूक करणारा लहान टेम्पो वडगाव येथे जनावरे सोडून आला. तो कळे येथे आल्यानंतर गाडी डाव्या बाजूने जात असताना चालकाने अचानक उजव्या बाजूला चुकीच्या बाजूला गाडी भरधावपणे घुसवली.
रस्त्याकडेला लावलेल्या दोन दुचाकींचा चुराडा करत प्रसाद पोवार यांच्या चहाच्या दुकानात घुसली. टेम्पोचे छत दुकानाच्या लोखंडी चॅनेलला तटल्याने प्रसाद पोवार वाचले. घटना घडताच कळे पोलिसांनी धाव घेतली.