चिपळूण पॉवर हाऊस येथे टेम्पो-दुचाकी अपघात
चिपळूण :
शहरातील पॉवर हाऊस येथे दुचाकीस्वाराला वाचवताना टेम्पो थेट महामार्गावरच्या दुभाजकावर गेल्याची घटना गुऊवारी घडली. यात स्थानिक दुचाकीस्वार किरकोळ स्वरुपात जखमी झाला. विशेष म्हणजे या अपघातानंतर अज्ञातांनी टेम्पोच्या काचा फोडल्या. दरम्यान, या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पुढे येत आहे.
आराध्य चिले असे जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तो पॉवर हाऊस येथून बहादूरशेख नाका येथे जात होता. टेम्पो रत्नागिरीहून महामार्गाने बहादूरशेख नाक्याच्या दिशेकडे जात होता. असे असताना पॉवर हाऊस नाका येथे आराध्य टेम्पोसमोर आल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी टेम्पो चालकाने महामार्गावरच्या दुभाजकावर नेला. या दरम्यान आराध्य रस्त्यावर पडल्याने तो किरकोळ स्वरुपात जखमी झाला. त्याता तत्काळ एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. असे असताच संतप्त अज्ञाताने या टेम्पोच्या थेट काचा फोडल्या. या घटनेनंतर अपघातठिकाणी बघ्यासाठी मोठी गर्दी झाली. घटनास्थळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी प्रयत्न केले. या संदर्भात पोलीस स्थानकात कोणावरही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पुढे येत आहे.