मंदिरे स्थापत्यशास्त्राचे अमूल्य संचित : डॉ. मंजिरी भालेराव
वसंत व्याख्यानमालेत ‘मंदिर स्थापत्य : उगम आणि विकास’वर गुंफले तिसरे पुष्प
बेळगाव : देशातील प्रत्येक राज्यात आढळणारी विविध मंदिरे म्हणजे भारतीय लोकांच्या श्रद्धांचे मूर्त रूप आहे. पुण्य कमावणे ही मंदिर निर्मितीमागची भावना होती. मंदिरांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची अखंडित परंपरा शाबूत राहिली आहे. माणूस सश्रद्ध असो किंवा नसो, आस्तिक किंवा नास्तिक असो, त्याला ही परंपरा माहीत आहे. मुख्य म्हणजे मंदिरांच्या माध्यमातून कारागिरांनी स्थापत्य शास्त्राच्या माध्यमातून हजारो वर्षांचे संचित आपल्यासाठी उपलब्ध करून ठेवले आहे, असे मत डॉ. मंजिरी भालेराव यांनी व्यक्त केले.
हेरवाडकर शाळेत सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प त्यांनी ‘मंदिर स्थापत्य : उगम आणि विकास’ या विषयावर गुंफले. प्रारंभी अध्यक्षा सुनीता देशपांडे यांनी त्यांचा सत्कार केला. श्रीया देशपांडे यांनी परिचय करून दिला. आजचे व्याख्यान उषा कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ मेधा देशपांडे यांनी पुरस्कृत केले होते. या व्याख्यानाला राज्य मराठी विकास संस्थेचे अनुदान लाभले. डॉ. मंजिरी भालेराव यांनी मंदिर स्थापनेपासूनचा इतिहास चित्रफितीच्या माध्यमातून दाखवला. महाराष्ट्रामध्ये देशातील एकूण लेण्यांपैकी 78 ते 80 टक्के लेणी आहेत. ही लेणी साधारण व्यापारी मार्ग आणि घाटमार्गावर आढळतात. या व्यापाऱ्यांनी बौद्ध धर्माचे साधे तत्त्वज्ञान अवलंबिले. ते या धर्माचे पाठीराखे झाले. त्यांनी गुहा कोरण्यासाठी अनेक ठिकाणी पैसे दिले.
प्रामुख्याने मंदिर बांधकामामध्ये नागर आणि द्रविड अशा दोन शैली दिसतात. उत्तर भारतात नागर शैली तर दक्षिण भारतात द्रविड शैली दिसून येते. दगडांमध्ये मंदिर कोरण्यास साधारण पाचव्या शतकात सुरुवात झाली. महाराष्ट्रामध्ये वाकाटक राज्यामध्ये मनसरला चांदणीच्या स्वरुपात शिवमंदिर आहे. उत्तर प्रदेशात देवगड येथे शिखर असणारे सर्वात जुने मंदिर आहे. कर्नाटकमध्ये कल्याण चालुक्य आणि बदामी चालुक्य अशा दोन घराण्यांनी मंदिरांचे बांधकाम केले, असे सांगून त्यांनी पट्टदकल आणि ऐहोळे या मंदिरांची माहिती दिली. या मंदिरांना आज जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळाली आहे, असेही त्या म्हणाल्या.
मंदिर म्हणजे देवांचे घर. मग ते माणसांच्या घरांपेक्षा वेगळे असावे म्हणून अनेक मजली इमारतीमध्ये मंदिर बांधले गेले. संपूर्ण शिखराचे लघुरूप, लघुशिखर रूपातून दाखविले गेले. दक्षिण भारतात चौकोन, आयताकृती व चापाकार (अॅपसायडल) अशा तीन पद्धतींनी मंदिरे बांधली गेली. कांचीपुरम येथे तीन मजली मंदिर असून तिन्ही गाभाऱ्यांमध्ये विष्णूची तीन वेगवेगळी रूपे आहेत. काही ठिकाणी शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य व सौर्य असा पंचायतनाचा विचार मंदिर बांधकामामध्ये केला गेला आहे. बृहधिश्वरा या तंजावर येथील मंदिरामध्ये शिवाची नृत्य स्वरुपातील 108 रूपे पाहायला मिळतात, असे त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रामध्ये यादव शैली अनुसरून मंदिरे बांधली गेली. पण त्यांचा दर्जा अत्युत्तम नव्हता. मध्यंतरी इस्लामी अंमलामुळे मंदिरांचे बांधकाम शास्त्र बदलले आणि इस्लामी पद्धतीने मंदिरांचे बांधकाम झाले. मराठा काळात नवीन मंदिरांची बांधणी झाली व काही मंदिरांचे नूतनीकरण झाले. पण याची बांधकाम शैली ही सरमिसळ शैलीची झाली, असे त्या म्हणाल्या. याच काळात दीपमाळा, नगारखाना अस्तित्वात आले. कोरीव कामापेक्षा भिंतींवर चित्रकला रेखाटणे, लाकडी मंटप तयार करणे, गाभारा छोटा करणे, पायऱ्यांची विहीर निर्माण करणे असे बदल होत गेल्याचे त्यांनी सांगितले. ही सर्व मंदिरे श्रीमंत समाजाची मंदिरे आहेत. परंतु, आजही समाजात अनेक देवांची मंदिरे नाहीत. परंतु, त्यांचे अस्तित्व निश्चितच आहे. स्थापत्य कलेचे वैविध्य आणि नमुने पाहण्यासाठी मंदिरांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. हे संचित आपण जपायला हवे, असे सांगून त्यांनी समारोप केला. सूत्रसंचालन श्रीया देशपांडे यांनी केले. धनश्री नाईक यांनी आभार मानले.