बिहारमध्ये मंदिरात चेंगराचेंगरी, 7 ठार
वृत्तसंस्था / जेहानाबाद
बिहारमधील जेहानाबाद जिल्ह्यातील मखदुमपूर विभागात असलेल्या बाबा सिद्धार्थ मंदिरात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. सोमवारी घडलेल्या या घटनेत 7 भाविकांचा मृत्यू झाला असून 10 भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रुणालयात उपचार केले जात आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे.
जेहानाबाद जिल्हाधिकारी अलंकृता पांडे यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली. हे या भागातील प्रसिद्ध मंदिर आहे. येथे सोमवारी सकाळी भाविक मोठ्या संख्येने प्रार्थना आणि पूजापाठासाठी एकत्र आलेले असताना ही चेंगराचेंगरीची घटना घडली. आता परिस्थिती नियंत्रणात असून घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे, असे प्रतिपादन पांडे यांनी केले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेसंबंधी दु:ख व्यक्त केले असून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची हानी भरपाई घोषित केली आहे. आपत्कालीन साहाय्यता पथके घटना घडल्यानंतर त्वरित पाठविण्यात आली असून त्यांनी भाविकांना साहाय्य करण्याच्या कामाला त्वरित प्रारंभ केला आहे, अशी माहिती देण्यात आली.
मृतांमध्ये 3 महिला
या घटनेतील मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. त्यांची नावे पूनम देवी, सुशिला देवी आणि निशा देवी अशी असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. हे मंदिर टेकडीच्या माथ्यावर असल्याने तेथे साहाय्यता पोहचविण्यासाठी काहीसा विलंब लागला. तरीही स्थानिकांच्या साहाय्याने वेळेवर साहाय्यता पोहचविण्यात यश आले. त्यामुळे अनेक भाविकांचे प्राण वाचले.
सिद्धेश्वरनाथ प्रसिद्ध मंदिर
या मंदिराचे मूळ नाव सिद्धेश्वरनाथ मंदिर असे असून ते शिवमंदिर आहे. ते बाबा सिद्धेश्वर मंदिर म्हणूनही परिचित आहे. तर सोमवारी मोठ्या संख्येने भाविक येथे जमतात. श्रावण सोमवारी भाविकांची संख्या सर्वाधिक असते. मंदिराच्या व्यवस्थापनाने योग्य सोय न केल्याने ही दुर्घटना घडली, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. मात्र, अद्याप चेंगराचेंगरीचे कारण समोर आलेले नाही.